चार दिवस उलटले तरीही नरभक्षक बिबट्या मिळेना, पैठण शिवार दहशतीखाली!    

paithan leopard.jpg
paithan leopard.jpg

पाचोड (औरंगाबाद) : बिबट्याच्या हल्ल्यात आपेगाव (ता.पैठण) येथील शेतकरी पिता-पुत्रास जीव गमवण्याच्या घटनेला चार दिवस उलटले. तरी अद्याप वनविभागाला धुमाकूळ घालून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यास यश आले नसल्याचे दिसते. अन् त्यात 'आला रे....आला' बिबटया आला..! च्या चर्चेने अवघा तालुका दहशतीखाली वावरुन शेतशिवार ओसाड पडले. बिबटया आल्याच्या गावोगावी होणाऱ्या चर्चेने ग्रामस्थांसह वनकर्मचाऱ्याची दमछाक होऊन ग्रामस्थ रात्रीचे जागरण करीत असल्याचे पाहवयास मिळते. 

तर दिवसा बिबट्याच्या शोधार्थ वन विभागाच्या कर्मचाऱ्यासह ग्रामस्थ आपल्या फौजफाट्यासह परिसर पिंजून काढत असले. तरी शेतशिवार ओस पडल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) परिसरासह सर्वत्र पाहावयास मिळते.

वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी अद्यापही कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने त्यांच्याविरुद्ध जनतेत संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपेगाव शिवारात ज्याठिकाणी घटना घडली. तेथे पाच ट्रॅप कँमेरे व सहा पिंजरे लावण्यात आले असून तालुक्यात सहा पथके तैनात करण्यात आली आहे. बिबट्याला शोधण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात असले तरी बिबट्या आल्याची चर्चा अधिकच वेगाने पसरत आहे. गुरुवारी (ता.१९) रजापूर, पाचोड, थेरगाव, कोळीबोडखा व वडजी शिवारात बिबटया दृष्टीस पडल्याच्या चर्चेला ऊत आला. वनविभाग या घटनेला जाम वैतागला असून एकाच वेळी चार गावांत बिबटया आल्याच्या बातमीने वनविभाग संभ्रमावस्थेत सापडला आहे. दरम्यान नागरिकांमध्ये सद्या बिबटयाच्या दहशतीने भितीचे वातारण पसरले असून रात्र तर काय दिवसाच्या वेळीही घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ, मजूरवर्ग घाबरत आहे.


शेतवस्तीवर वास्तव्यास असलेले शेतकरी, शेतमजूर आपापली जनावरे घेऊन कुटुंबांसमवेत गावाची वाट धरुन गावाकडे वास्तव्यास येत असल्याने शेतशिवार ओस पडल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता.१९) सकाळी दहा वाजता पाचोड गावालगत दिलीप भुमरे व अनिल भुमरे यांच्या केळीच्या बागेत बिबट्या बसलेल्या अवस्थेत काम करणाऱ्या मजुरांना दिसताच त्यांनी पळ काढत शेतमालकाला या घटनेची कल्पना दिली. माहीती मिळताच ग्रामस्थांचा मोठा जमाव एकञित येऊन बिबट्याच्या शोध घेण्यासाठी शेतात घुसला. परंतु नागरिकांच्या आवाजामुळे व घनदाट झाडी व पिकामुळे बिबट्या निसटला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्या आल्याची ही वार्ता आसपासच्या शेतकऱ्यांसह अन्य गावांत पसरताच सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. जवळपासच्या शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेले महिला शेतमजूर गावाकडे परतल्या.पाचोडसह लिंबगाव, रांजणगाव, थेरगाव, कुतूबखेडा, सालवडगाव परिसरात दहा दिवसापासून ठिकठिकाणी शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होत आहे. रांजनगाव, सालवडगाव व थेरगाव शिवारात तर दोन बछड्यासोबत बिबट्या शेतात मुक्त संचार करतांना शेतकऱ्यांच्या दृष्टी पडला. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल होत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ठिकठिकाणी बिबट्या संदर्भात मिळणाऱ्या माहितीवरुन व कानी पडणाऱ्या चर्चेवरुन वनविभागाचे कर्मचारी गोंधळलेल्या अवस्थेत आहे. 

सध्या या भागात बिबट्याच्या भितीपोटी शेतीचे पूर्ण कामे ठप्प आहे. वनविभागास अद्याप या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात यश आले नाही.त्यामुळे या तालुक्यात लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास देखील लोक घाबरत आहेत.या बिबट्याला लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश येत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये रोष वाढू लागला आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडा,अन्यथा आंदोलन करु असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे आता नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू असून बिबट्याला पकडण्यासाठी आपेगावसह पाचोड भागात वनविभागाचे पथके आले आहे. वनविभागाचे जवळपास तीस कर्मचारी परिसरात बिबट्याचा शोध घेत आहे. 

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. बिबट्या लवकर सापडावा यासाठी जवळपास ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले असून ड्रोन कॅमेराच्या साह्याने देखील बिबट्याचा शोध घेतला जात आहे.मात्र आपेगाव येथील घटनेला पाच दिवसांचा कालावधी पूर्ण होत आला असला तरी अद्याप बिबट्याचा शोध न लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

'सध्या कापूस वेचणीचा  हंगाम सुरू आहे.त्यामुळे सर्वञ कापूस वेचण्याच्या कामाने वेग घेतलेला आहे. ऐन सुगीच्या काळातच बिबट्याच्या दहशतीने शेतकरी घाबरले आहेत. काही ठिकाणी जीव मुठीत घेऊन शेतकरी कामे करीत आहेत. बिबट्याला जेरबंद करण्या साठी काही दिवसांपासून वनविभागाने पथके तयार केली.मात्र वनविभागास अद्याप बिबट्या सापडला नाही.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com