शेतकरी बापाचा विश्वास लेकीने जिंकला, उपसरपंचपदी झाली बिनविरोध निवड

संतोष शेळके
Thursday, 11 February 2021

कुंभेफळ येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर शेळके यांनी आपल्या अभियंता मुलीवर विश्वास ठेऊन तिला ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरवले.

करमाड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्यांपैकी सरपंच व उपसरपंचपदासाठी औरंगाबाद तालुक्याचे सोमवारी (ता.आठ) मतदान घेण्यात आले. यात जिल्ह्यात सर्वांत तरूण सदस्या म्हणून निवडून आलेल्या २१ वर्षीय मनीषा शेळके या तरुणीची कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

एमजीएम रुग्णालयात ज्येष्ठावर दुर्मिळ शस्त्रक्रिया; चिरफाड न करता कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण

राजकारणात पुरूषराजच चालतो हे सर्वश्रुत आहे. आरक्षण पद्धतीमुळे नाईलाजाने पत्नीला पुढे करावे लागते ते निवडणुकी पुरतेच. मात्र, एकदा का पद मिळाले की नंतर महिला पदा आडुन पुरूषच सर्व कारभार हाकतात. यात एक तर पती किंवा मुलगाच कारभार बघत असतो. तथापि, पत्नीऐवजी अविवाहित मुलीला कुणी उमेदवारी दिल्याचे जास्त ऐकीवात नाही. मात्र, कुंभेफळ येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर शेळके यांनी आपल्या अभियंता मुलीवर विश्वास ठेऊन तिला ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरवले. ती विक्रमी मते घेऊन विजयी सुद्धा झाली.

शाळा सुरु झाल्यानंतरही विद्यार्थी घरीच, शिक्षकांच्या आंदोलनाचा फटका का?

विजयानंतर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या दाखल नामनिर्देशन अर्जानुसार ती जिल्ह्यात निवडून आलेली सर्वात कमी वयाच्या सदस्याही ठरली. एवढ्यावरच या मुलीचे नशीब थांबले नाही तर अगोदर ग्रामस्थ व नंतर नवनियुक्त सदस्यांच्या कृपा आशीर्वादाने तिची सोमवारी उपसरपंचपदी बिनविरोध वर्णी लागली. या बद्दल तिचे संपूर्ण जिल्ह्यातून सोशल मीडियाद्वारे अभिनंदन होत आहे. मनिषा सध्या औरंगाबाद शहरातील जेएनईसी महाविद्यालयातून साॅफ्टवेअर इंजिनियरिंग पदवीतील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा

राजकारणातील प्रवेशाविषयी विचारले असता मनीषा म्हणाली की, आमचे गाव शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीलगत असल्याने गावात आतापर्यंत विविध सुखसुविधा पोहोचल्या आहेत. मात्र, नवनवीन संकल्पना राबवुन गावची राज्याबाहेर नवीन ओळख बनवायची आहे. मुलींसाठी व्यायामशाळा , वेगळी अभ्यासिका, वयोवृद्धांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिका अधिक कसा मिळवून देता येईल. यासाठी काम करायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
              

सर्व प्रथम आपल्या मार्फत ग्रामस्थ व वडीलधार्‍यांचे आभार मानते. दिलेली जबाबदारी माझ्यासाठी खुपच मोठी आहे. त्याची उतराई होणे शक्य नाही. 
- मनीषा शेळके, नवनिर्वाचित उपसरपंच, कुंभेफळ

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manisha Shelke Appointed As Vice Sarpanch Of Kumbhefal Aurangabad Latest News