विभक्त विवाहितेवर चार वर्षांपासून अत्याचार, व्हिडिओ व्हायरलची द्यायचा धमकी!

सुषेन जाधव
Wednesday, 4 November 2020

दोघांविरोधात सिडको पोलिसात गुन्हा दाखल. 

औरंगाबाद : नारेगावातील विभक्त विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांपासून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून अशोक विधाते (रा. राजेंद्रनगर, नारेगाव) व अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारा विधातेचा साथीदार सय्यद शकील (रा. मिसारवाडी) या दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी, अत्याचारप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नारेगावातील ३० वर्षीय विवाहिता दहा वर्षांपासून विभक्त राहते. ती गेल्या चार वर्षांपासून आई-वडिलांसोबत राहते. नारेगाव परिसरात तिचे कापड दुकान आहे. त्यामुळे ती आईबाबांच्या गावावरून दररोज नारेगावातील दुकानात दुचाकीने जाणे-येणे करायची. नारेगावातील तिच्या दुकानात अशोक विधाते नेहमी कपडे घेण्यासाठी यायचा. त्यावेळी त्याच्याशी विवाहितेची ओळख झाली होती. दरम्यान, २५ एप्रिल २०१६ रोजी दुपारी विधातेने तिला फोन करून ‘माझे तुझ्याकडे महत्त्वाचे काम आहे. तू मला भेटायला टीव्ही सेंटरला ये’ असे म्हणून त्याने नातेवाइकांच्या घरी बोलावले. तेथे गेल्यावर विधातेने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण आयुष्यभर सोबत राहू, तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’ असे म्हणून विधातेने तिच्याशी बळजबरी केली. पुढे विधाते वारंवार तिला टीव्ही सेंटर येथील नातेवाइकाच्या घरी बोलवायचा व शारीरिक संबंध ठेवू लागला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाच लाख दे, नाहीतर व्हिडिओ व्हायरलची द्यायचा धमकी 

अशातच २५ ऑक्टोबरला सकाळी त्याने फोन करून पुन्हा नातेवाइकाच्या घरी बोलावले. त्यावेळी देखील त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दोघे बोलत असताना विधातेने तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली. त्यावर विवाहितेने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विधातेने आपल्यासोबतचे व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याचवेळी त्याने मोबाईलमधील दोघांचे अश्लील व्हिडिओ तिला दाखवले. या प्रकारामुळे विवाहितेला धक्का बसला. त्यानंतर त्याचा साथीदार सय्य्द शकील नारेगावातील एका हॉटेलसमोर भेटला. त्याने ‘विधातेने जरी तुझे अश्लील व्हिडिओ डिलीट केले, तरी ते सर्व व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहेत. मी ते सर्वांना दाखवतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर विवाहितेने घडलेला प्रकार भाऊ व आईला सांगितला. त्यानंतर विवाहितेने सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ करत आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman rape case Aurangabad crime news