ग्राहकांनो तुमचे वीजबिल जास्तीचे आले, घाबरु नका ! खात्री करण्यासाठी वापरा ही पद्धत !

अनिलकुमार जमधडे
Saturday, 12 September 2020

  • -महावितरणने भरमसाठ वीजबिले दिल्याचा आरोप. 
  • -ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न.
  • -वीजबिल दुरुस्तीची केली सोय.
  • -सवलतीत भरण्याचाही दिला पर्याय. 

औरंगाबाद : लॉकडाउनच्या काळात महावितरणतर्फे भरमसाठ बिले आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र हे बिले बरोबर असल्याचा दावा महावितरण करत आहे. गेल्या दोन महिन्यापासून या एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. म्हणूनच महावितरणने यासाठी लिंक उपलब्ध करुन दिली आहे. लिंकवर क्लिक करुन आपले बिल तपासण्याची सोय करुन दिल्याने नागरीकांनी भरणा सुरु केला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये नागरीक घरामध्ये होते, त्यातच कडक उन्हाळा होता. त्यावर कडी म्हणजे १ एप्रिल पासून वीजेचे दर वाढवले आहे. एकूण या सर्व बाबीमुळे ग्राहकांना भरमसाठ वीजबीले आले आहेत. लॉकडाउनच्या काळात सुरवातीची तीन ते चार महिने मागील तीन महिन्याच्या सरासरीनुसार बिले दिली. ही बिले भरल्यानंतरही भरमसाठ बिले आल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काय आहे महावितरणचे म्हणणे 
लॉकडानउनंतर मीटर रीडिंग व ग्राहकांच्या वीज वापरानुसार तीन, चार किंवा पाच महिन्यांचे एकत्रित व अचूक वीजबिल देणे सुरु केले आहे. मात्र एकत्रित वीजबिलामुळे वीजबिल अधिक असल्याचा संभ्रम दूर करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार वेबसाईट उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर ग्राहक क्रमांक टाकताच खात्री करुन घेता येणार आहे. 

शंका निरसन करण्याचा प्रयत्न 
अधिक बिलाच्या तक्रारीच्या अनुषंगाने महावितरणतर्फे वेबिनारद्वारे बिले समजावून सांगण्यात आली आहेत. उपविभाग व विभाग पातळीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली. या पथकांकडून ग्राहकांना फोनवरून लॉकडाउन बिले समजावून सांगण्यात येत आहेत. तरीही समाधान न झाल्यास ई-मेल आयडी energyminister@mahadiscom.in व मोबाईल क्र.९८३३५६७७७७ व ९८३३७१७७७७ यावरून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिल दुरुस्तीचीही केली सोय 
लॉकडाउनमुळे जे घरगुती ग्राहक आपल्या मूळगावी गेले होते. त्यांचा वीजवापर हा अगदी कमी झाला आहे. तरी त्यांना मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वीज वापरानुसार सरासरी वीज बिल देण्यात आले आहे. अशा ग्राहकांच्या वीजमीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन त्यांचे वीज बिल दुरूस्त करण्यात येत आहे. 

वीजबिल भरण्यासाठी दिलासा 
घरगुती ग्राहकांना एकत्रित बिल ३ हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही. कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन वीजबिलाच्या किमान एक-तृतीयांश रक्कम भरता येणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास वीजबिलामध्ये २ टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण वीजबिल भरले असल्यास, त्यांनाही ही सूट पुढील वीज बिलामध्ये देण्यात येत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL Customers electricity bill news