हातातला साप अंगावर सोडतो, भीती दाखवून लुटले आणि केला खून

मनोज साखरे
मंगळवार, 17 मार्च 2020

सोहेल आणि इम्रान शेख या सापाची भीती दाखवून लुबाडणूक करीत होते तो साप बिनविषारी आहे. हा बिनविषारी साप सोहेल स्वतःजवळ बाळगून लोकांना तो विषारी असल्याचे सांगत धमकावत लुबाडत होता.

औरंगाबाद : स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला मोकळ्या जागी हेरून त्याला अंगावर साप सोडण्याची भीती दाखवत आधी पैसे लुबाडले, नंतर मोबाईल हिसकावताना विद्यार्थ्याने विरोध केला. त्यावेळी त्याच्यावर फिल्मी स्टाईलने धारदार शस्त्राने वार करून त्याचा दोघांनी खून केला.

ही गंभीर घटना 16 मार्चला रात्री साडेनऊला औरंगाबाद येथे घडली. सापाची भीती दाखवून लुटणार्‍या या जोडगोळीला मंगळवारी (ता. 17) औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सोहेल खान (वय 18, रा. इंदिरानगर),  इम्रान शेख (वय 30) अशी संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल आरोपी आहेत. यापैकी सोहेल खान हा त्याच्याकडे साप बाळगत होता आणि याच सापाची भीती दाखवून तो इमरान शेख याच्या साथीने मोकळ्या ठिकाणी अथवा एकट्यात व्यक्तीला गाठून लुबाडीत होता, अशी माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तायडे यांनी दिली.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

यापूर्वी या जोडगोळीने अनेकांना लुबाडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अक्षय प्रधान (वय 22, मूळ रा.परभणी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. संग्रामनगर उड्डाणपूल येथील म्हाडा कॉलनीतील मैदानावर सोमवारी (ता. 16) रात्री नऊ ते साडे नऊच्या सुमारास धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. 

असा लागला मारेकऱ्यांच्या हाती

अक्षय, 16 मार्चला एका मित्राला भेटण्यासाठी दुचाकीने संग्रामनगर उड्डाणपुलाजवळच्या म्हाडा कॉलनीत आला होता. रात्री पावणे नऊच्या सुमारास दोघेजण गाडीवर बोलत होते. बोलत बोलतच ते जवळच्या मैदानाजवळ गेले. त्या ठिकाणी काही वेळातच एका मोटारसायलवर सोहेल खान आणि इम्रान शेख आले. त्यातील सोहेलच्या हातात साप होता. सोहेलने सापाची भीती दाखवून अक्षयचे पैसे लुबाडले. त्यानंतर दोघे मोबाईलची मागणी करीत होते.

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

एकाने अक्षयच्या हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. अक्षयने मोबाईल देण्यास नकार दिल्यावर तिथे त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर दोघांनी अक्षयच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अक्षय रक्तबंबाळ झाला. नंतर मारेकरी पसार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत अक्षय जिवाच्या आकांताने पळत सुटला. म्हाडा कॉलनीच्या मैदानापासून साठ ते ऐंशी फूट आल्यानंतर कॉलनीतील एका रस्त्यावर तो धाडकन पडला.

राज्यात कोरोनाचा पहिला बळी मुंबईत, वाचा सविस्तर

हे पाहून कॉलनीतील नागरिक धास्तावले. त्यांनी याच परिसरात राहणाऱ्या श्रीमंत गोर्डे पाटील यांना संपर्क केला व घटनेची माहिती दिली त्यानंतर गोर्डे पाटील यांनी जवाहर नगर पोलिस ठाणे पोलिसांना खुनाच संदर्भात माहिती दिली. त्यानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला तसेच निपचित पडलेल्या अक्षयला रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

तो साप बिनविषारी.. 

सूत्रांनी माहिती दिली की सोहेल आणि इम्रान शेख या सापाची भीती दाखवून लुबाडणूक करीत होते तो साप बिनविषारी आहे. हा बिनविषारी साप सोहेल स्वतःजवळ बाळगून लोकांना तो विषारी असल्याचे सांगत धमकावत लुबाडत होता. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून दोघांनीही यापूर्वी अशा पद्धतीचे गुन्हे केले आहेत याची माहितीही पोलीस घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder In Aurangabad Crime News