आधी आठ लाख हडपले अन् नंतर  एसटी चालकाचे मुंडकेच छाटले! 

अनिलकुमार जमधडे
Monday, 13 July 2020

पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, लिपीकासह दोघांना ठोकल्या बेड्या 

औरंगाबाद : एसटी महामंडळातून चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या बसचालकाची लिपिकाने खोटी स्वाक्षरी करुन भविष्य निर्वाहनिधीची आठ लाखांची रक्कम हडप केली. त्यानंतर प्रकार उघड झाल्याने वृध्द चालकाचे शिर धडावेगळे करुन निर्घृण खून केला. सोलापूर-धुळे महामार्गाजवळील एका विहीरीतून सोमवारी (ता. तेरा) सिमेंटच्या पोत्यात बांधलेले धड आणि झाल्टा फाट्यावरुन शीर हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात लिपीक अतिक अमीर काझी (३५, रा. एसटी कॉलनी, कटकट गेट) आणि अफरोज खान जलील खान (३५, रा. सातारा परिसर) यांना पोलिसांनी अटक केली. 
एसटीतील चालक मुजीब अहेमद खान आबेद रशिद खान (५९, रा. शहानगर, बीड बायपास) हे चार महिन्यांपुर्वी निवृत्त झाले. मुजीब खान यांची निवृत्ती आणि भविष्य निर्वाहनिधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती. ९ जुलै रोजी मुजीब खान हे दुपारी विभाग नियंत्रक कार्यालयात गेले होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुजीब खान यांचा मुलगा रशीद खान याने क्रांतीचौक पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. नातेवाइकांनी लिपीक अतिक काझी याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यावरुन त्याची दोन दिवसांपासून कसून चौकशी सुरू होती. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रक्कम हडपली 

बसचालक मुजीब खान हे डिसेंबर १९ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीची रक्कम काढण्यासाठी त्यांनी विभागीय कार्यालयातील लिपिक अतिक काझी याच्याकडे कोऱ्या चेकवर स्वाक्षरी करुन दिले होते. त्यानंतर मुजीब खान हे धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी निघून गेले. तेथून परतल्यानंतर लगेचच त्यांनी काझीकडे पैशाची मागणी केली. मात्र, तोपर्यंत अतिक काझीने बनावट स्वाक्षरी आधारे स्टेट ट्रान्सपोर्ट को-आँपरेटिव्ह बँकेतून मुजीब खान यांच्या खात्यावरील निवृत्तीची आठ लाखांची रक्कम परस्पर काढली. हे प्रकरण समजल्याने मुजीब खान यांनी अतिक काझीकडे पैशासाठी तगादा लावत पोलिसात फसवणूकीची तक्रार देण्याचे धमकावले होते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अपहरण, खून 

९ जुलैरोजी दुपारी मुजीब खान यांनी अतिक काझीला विभागीय कार्यालयात गाठले. त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्याने मुजीब खान यांना कारमध्ये बसवून देवळाई येथील नातेवाइकाकडे रक्कम आणण्यासाठी जायचे असे म्हणत सोबत नेले. यावेळी मुजीब खान यांनी पत्नीशी संपर्क साधून तिला काझीसोबत कारने जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काझीने वर्गमित्र असलेल्या अफरोज खानच्या घरी नेले. त्यानंतर त्यांचे तोंड दाबून पाठीमागून लोखंडी रॉडने वार केला. मुजीब खान हे बेशुध्द होताच तीक्ष्ण हत्याराने त्यांचे शिर कापून धडावेगळे केले. 

शीर इकडे अन् धड फेकले तिकडे 

हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी अतिक काझी आणि अफरोज खान यांनी सिमेंटच्या रिकाम्या गोणीत मृत मुजीब खान यांचे धड टाकून त्यावर सिमेंट आणि दगड टाकले. त्यानंतर शिरदेखील एका सिमेंटच्या गोणीत भरुन कारने सोलापूर-धुळे महामार्गाजवळील एका विहीरीत धड टाकले. तर शिर असलेली गोणी झाल्टा फाट्याजवळील एका पडक्या खोली जवळील झाडा-झुडूपात फेकले. त्यापुर्वी मुजीब खान यांचा मोबाइल व त्यातील सिमकार्ड सातारा परिसरात एका ठिकाणी फेकून दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघेही तेथून परतले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांनी लावला छडा 

मुजीब खान यांच्या नातेवाइकांनी अतिक काझीवर संशय व्यक्त केला होता. त्यावरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल सुर्यतळ, उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहायक फौजदार नसीम पठाण, जमादार सलीम सय्यद, पोलिस नाईक राजेश फिरंगे, शिपाई मनोज चव्हाण, मिलींद भंडारे, संतोष रेड्डी, दयानंद मरसाळे यांच्या पथकाने रविवारी विभागीय कार्यालयातील सीसीटिव्हीची तपासणी केली. त्यात मुजीब खान हे सायकल उभी करुन कार्यालयात जाताना दिसले. तसेच अतिक काझी देखील त्यानंतर बाहेर पडताना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अतिक काझीच्या कारची तपासणी करण्यासाठी रविवारीच बीड बायपासवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्याची कार ये-जा करताना सीसीटीव्हीत दिसली. त्यानंतर अतिक काझीला खाक्या दाखवण्यात आला. त्याने रात्री खुनाची कबुली दिल्यानंतर सोमवारी (ता. तेरा) सकाळी अकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रशीद खान यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. 

लॉकडाऊनच्या काळात सहा खून 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागु असताना शहरात तीन महिन्यांच्या काळात सहा घटनांमध्ये सात जणांचा खून झाला आहे. किलोभर सोन्यासाठी सातारा परिसरात बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. त्यापुर्वी नकोशा बालकाचा राजाबाजारात खून झाला होता. तर त्यानंतर वाळूज औद्योगिक वसाहतीत एका पाठोपाठ तिघांची हत्या झाली आहे. त्यापाठोपाठ एसटी चालकाचा खून झाला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of ST driver