
भारताचे संविधान म्हणजे केवळ घटनाच नाही, तर या देशातील प्रत्येक व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा दस्तऐवज आहे. म्हणूनच संविधानाची चळवळ लोकांमध्ये रुजली पाहिजे या उद्देशाने चेतन कांबळे यांनी मोफत संविधान वाटपाची चळवळच सुरू केली आहे.
औरंगाबाद - देशभरातील दूषित होणाऱ्या वातावरणाच्या अनुषंगाने भारतीय संविधान शेवटच्या घटकापर्यंत रुजवले पाहिजे, या प्रमुख उद्देशाने संविधान रुजवण्यासाठी चेतन कांबळे या तरुणाची धडपड सुरू आहे. भीमशक्ती विचार मंच या सामाजिक संघटनेमार्फत त्यांनी पाच हजार संविधानाच्या प्रती आणि पन्नास हजार संविधान उद्देशिकांचे वाटप केले आहे. ही चळवळ शेवटच्या घटकापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.
भारताचे संविधान म्हणजे केवळ घटनाच नाही, तर या देशातील प्रत्येक व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा दस्तऐवज आहे. म्हणूनच संविधानाची चळवळ लोकांमध्ये रुजली पाहिजे या उद्देशाने चेतन कांबळे यांनी मोफत संविधान वाटपाची चळवळच सुरू केली आहे.
जयभीम फेस्टिव्हल
शहरात चेतन कांबळे हे प्रत्येक वर्षी भव्य असा जयभीम फेस्टिव्हल घेत आहेत. या कार्यक्रमात विविध घटकांतील व्यक्तींचा सन्मान संविधानाच्या प्रती देऊन केला जातो. याशिवाय वर्षभर विविध कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू देण्याऐवजी संविधानाची प्रत देण्याचे काम चेतन कांबळे करीत आहेत.
संविधानाच्या पाच हजार प्रती वाटप
चेतन कांबळे यांनी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून 30 हजार संविधानाच्या प्रती घेतल्या आहेत. त्यापैकी पाच हजार प्रती आणि पन्नास हजार संविधान उद्देशिकांचे वाटप केले आहे. प्रत्येक कार्यक्रमात आणि विवाह सभारंभात ते भेट म्हणून संविधानाचीच प्रत देत आहेत. ही मोहीम अविरत चालू ठेवणार असल्याचे चेतन कांबळे यांनी सांगितले. संविधान हे बालमनापासून रुजवले पाहिजे. लहान वयातील मुलांवर दुर्दैवाने जातीय भावना रुजवली जात आहे. या देशाला जातीय व्यवस्थेची नाही, तर सर्वधर्म समभाव अशी शिकवण देणाऱ्या संविधानाची खरी गरज आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
अभ्यासात असावा विषय
शालेय अभ्यासक्रमात संविधान विषयाचा समावेश करावा यासाठी पाठपुरावा करण्याची तयारी श्री. कांबळे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच संविधान उद्देशिका भिंतीमध्ये उभारली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची देशाला आणि जगाला गरज आहे. त्यामुळचे "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या पन्नास हजारांपेक्षा अधिक प्रतींचेही वाटप श्री. कांबळे यांनी केले आहे.
ऊर्जाभूमीचे स्वप्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी कायम ऊर्जा देण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांनी गोरगरीब, वंचितांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाची मुहूर्तमेढ येथे रोवली. त्यामुळेच औरंगाबाद लेण्यांच्या पायथ्याशी सोळा एकर परिसरात ऊर्जाभूमी उभारण्याच्या कामाला कांबळे यांनी सुरवात केली आहे. या भूमीत प्रवेश करताच, बारा फूट उंचीची भव्यदिव्य संविधान उद्देशिका नजरेस पडणार आहे. प्रत्येक पर्यटकाने भेट द्यावी असे हे ठिकाण निर्माण करण्याचा संकल्प चेतन कांबळे यांनी केला आहे.
हेही वाचा -
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा...
या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल
या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS