ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे रद्द, राज्य शासनाच्या आश्वासनामुळे निर्णय

माधव इतबारे
Friday, 18 December 2020

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले आहे.

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे यापुढे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघणार नाहीत. मात्र ओबीसींच्या अन्य अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी येथे दिला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहाला औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार होता.

 

 

मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने महात्मा फुले चौकातच झालेल्या आभार सभेत भुजबळ बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, बाळासाहेब कर्डक, सुभाष राऊत आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाजाच्या काही जणांनी वेगळी याचिका दाखल केली आहे. त्यात ओबीसी आरक्षण चुकीचे आहे, असे म्हणणे मांडण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे.

 

 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा शब्द दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही असेच आश्वासन दिले आहे. विरोधी पक्षही ओबीसींच्या बाजूने असल्याने भीती नाहीशी झाली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील मोर्चा शेवटचा असेल. यापुढील मोर्चे रद्द करण्यात येत आहेत. यापुढे पदाधिकारी संबंधित ठिकाणी तहसीलदारांना फक्त निवेदन देऊन मागण्या मांडतील.

 

खंत आणि इशारा...
बापूसाहेब भुजबळ, बाळासाहेब कर्डक, मनोज घोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी समाजाचे मोर्चे निघत असताना ओबीसी समाजाने पाठिंबा दिला. आज ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघत असताना कोणी पाठिंब्यासाठी समोर आले नाही, अशी खंत घोडके यांनी व्यक्त केली. निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांना आपली आठवण येते. त्यावेळी त्यांना जागा दाखवू, असा इशारा घोकडे यांनी दिला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OBC Reservation Save Morchas Cancelled, State Government Give Assurance Aurangabad