अधिकाऱ्यांना अभय, कर्मचाऱ्यांना शिक्षा! सातारा पोलिस हद्दीतील जुगार प्रकरण!

सुषेन जाधव
Friday, 13 November 2020

निर्णयावर प्रश्‍नचिन्ह : जुगाऱ्यांच्या वादाचे प्रकरण 

औरंगाबाद : सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा चालविण्याच्या वादातून दोन गटात राडा झाला. या प्रकरणात एकमेकांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले. सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले होते. चौकशीत सातारा गुन्हे प्रकटीकरणातील पाच कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांची उचलबांगडी करत तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. विशेष म्हणजे ठाण्यातील अधिकाऱ्यांना मात्र या प्रकरणात अभय मिळाल्याचे सूर उमटले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लिंक रोडवर जुगार अड्डा चालविण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला होता. ही घटना ३० ऑगष्टला घडली. शिवाय एका तरुणाला पोलिसांना माहिती पुरविल्याच्या वादातून मारहाणदेखील झाली होती. याची तक्रार तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे करण्यात आल्यानंतर ६ सप्टेबर रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चौकशी अहवाल पोलीस आयुक्तालयात सादर करण्यात आल्यानंतर पाच कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना प्रशासकीय कारणावरून मुख्यालयात बदली करण्यात आल्याचे आदेश १२ नोव्हेंबररोजी रात्री उशिरा काढण्यात आले. आदेश प्राप्त होताच पाचही कर्मचारी शुक्रवारी (ता.१३) सकाळी मुख्यालयात हजर झाले आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आश्‍चर्य म्हणजे, या प्रकरणात केवळ पाच कर्मचाऱ्यांना दोषी ठरविले गेले, त्यात सहायक फौजदार सखाराम सानप, मच्छिंद्र ससाणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप ससाणे, शेख कैसर, विलास वैष्णव यांचा समावेश आहे. हे कर्मचारी त्या वेळी गुन्हे प्रकटीकरणात असल्याने त्यांच्यावर ठपका ठेवत त्यांची उचलबांगडी करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: officers Protection but punishment employees Satara police station news