'पाटोद्यातील सर्व नवनिर्वाचित सदस्य शिवसैनिकच'

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 23 January 2021

२५ वर्षांच्या कार्यकाळात पाटील यांनी पाटोद्याला महाराष्ट्रातील आदर्श गाव आणि ग्रामपंचायत बनवले होते

औरंगाबाद: महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी लढवली नव्हती. निवडणुकीच्या अगोदरच याची घोषणा पेरे पाटील यांनी केली होती. २५ वर्षांच्या कार्यकाळात पाटील यांनी पाटोद्याला महाराष्ट्रातील आदर्श गाव आणि ग्रामपंचायत बनवले होते. पण या २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील यांच्या कन्या पराभूत झाल्या आहेत.

मागील २५ वर्षांची भास्कर पेरे पाटलांची सत्ता पाटोद्यातून संपुष्टात आली आहे. पोटोद्यात निवडणुकीआधी बिनविरोध निवडूण आलेले ८ आणि ३ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर विजयी झालेले असे सर्व ११ नवे सदस्य गावचा कारभार पाहणार आहेत. आज या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची भेट घेतली. हे सर्व सदस्य शिवसैनिक असून पाटोदा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला असल्याचे अंबादास दानवे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Gram Panchayat Election: उदगीर तालुक्यात सरपंचपदाची सोडत लवकरच | eSakal

महाराष्ट्रात ज्यावेळेस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाली होती त्यावेळेस राज्यातील हिवरेबाजार, राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतीवर सगळ्यांची नजर होती. कारण एकीकडे हिवरेबाजारातील कित्येक वर्षांची बिनविरोध निवडणुकांची परंपरा खंडीत झाली होती तर दुसरीकडे आदर्श गाव पाटोदा येथे भास्कर पेरे पाटील यांच्या विरोधात गावातील तरूणांनी दंड थोपटल्यामुळे.

देशात तसेच राज्य पातळीवर पोटोद्याचे नाव आदर्श ग्रामपंचायत केले असताना तसेच अनेक पुरुस्कार मिळाले असतानाही भास्कर पेरे पाटील यांच्या विरोधात गाव का गेले? याची चर्चा राज्यभरात सुरु होती.

स्वतःच्या गावातच विरोध होत असल्याचे पाहून पेरे व त्यांच्या समर्थक सदस्यांनी निवडणूकच लढवायची नाही असा पावित्रा घेतला. त्यामुळे विरोधी पॅनलचे आठ सदस्य बिनविरोध निवडूण आले होते. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणुक झाली, यात पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा हिचा देखील पराभव झाला. त्यामुळे या निकालानंतर देखील पोटाद्याची चर्चा राज्यभरात झाली होती. 

संदीप क्षीरसागरांची आघाडी बीड नगरपालिकेत घायाळ झाली का? काकांच्या गटाकडे सर्व समित्या |

'आता पाटोदा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. निवडूण आलेले सर्व ११ सदस्य हे शिवसैनिकच आहेत', असल्याचे मत आमदार अंबादास दानवे यांनी मांडले आहे. पाटोद्यातील नवनिर्वाचित  ग्रामपंचायत सदस्यांचा अंबादास दानवे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात आज सत्कार करत अभिनंदन केले.

निवडूण आलेल्या सदस्यांमध्ये कपिंद्र पेरे, पुष्पा सोमीनाथ पेरे ,सुनिता कृष्णा पेरे, बब्बाभाई कैलास पेरे, पुनम गाडेकर, मिरा जाधव, शामल थटवले ,लक्ष्मण मातकर, छाया पवार, जयश्री दिवेकर, मंदा खोकड यांचा समावेश आहे. अंबादास दानवे  यांनी नवनिर्वाचित सदस्यांना सत्काराप्रसंगी आदर्श असलेल्या पाटोदा गावाची परंपरा कायम ठेवावी, समाजाच्या व जनतेचे कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही केले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patoda gram panchayat election ambadas danve bhaskar pere patil