फौजदारानेच मागितला अंमलदारांकडे ‘हप्ता’! मुख्यालयातील संशयित अटकेत

सुषेन जाधव
Saturday, 12 December 2020

पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर ड्युटी देण्यासाठी दरमहा लाचेच्या स्वरूपात ‘हप्ता’ वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद : पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर ड्युटी देण्यासाठी दरमहा लाचेच्या स्वरूपात ‘हप्ता’ वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यालयाबाहेर दिलेली ड्युटी न बदलण्यासाठी दोन अंमलदारांकडून सहा हजार रुपये दरमहा ‘हप्ता’ मागण्याऱ्या मुख्यालयातील राखीव पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता.११) घरातून अटक केली. राजकुमार उत्तमराव चांदणे (५७) असे त्या संशयित फौजदाराचे नाव आहे. या कारवाईमुळे मुख्यालयात खळबळ उडाली.

पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून चक्क हप्ते वसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. वेळेत ‘हप्ते’ न दिल्यास संबंधितांना गार्ड ड्युटी, बंदोबस्त लावून त्यांचा छळ केला जातो. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र वरिष्ठ अधिकारी तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले.

रेकॉर्डिंग करून दिली तक्रार
संशयित फौजदार चांदणे यांनी पोलिस आयुक्तालयातील दोन अंमलदारांना वारंवार ड्युटी बदलण्याची धमकी देत छळ केला. नाईट ड्युटी न बदलण्याची विनंती केली असता चांदणे यांनी दरमहा प्रत्येकी तीन हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. दोघांचे सहा हजार दिल्यास ड्युटी बदलणार नाही, असे सांगितले. याचे रेकार्डिंग करून संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्याकडे तक्रार नोंदवली. शहानिशा केल्यावर राजकुमार चांदणे यांनी सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या पथकाने राजकुमार चांदणे यास घरातून अटक केली. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

...अन् तत्काळ आजारी रजा
आपल्याविरोधात ‘एसीबी’त तक्रार केल्याची कुणकुण लागताच चांदणे यांनी आजारपणाची रजा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी चांदणेंना यापूर्वी दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते हजर राहिले नव्हते, असेही सूत्रांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Sup Inspector Catch In ACB Trap Aurangabad News