esakal | ‘प्रहार’चे आंदोलन तूर्त मागे, पालकमंत्र्यांची मध्यस्थी
sakal

बोलून बातमी शोधा

Prahar

भाजप नेते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या कथित विधानाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून (ता.१०) पाण्याच्या टाकीवर सुरू केलेले आंदोलन तब्बल ३२ तासांनंतर शुक्रवारी (ता.१२) मागे घेण्यात आले.

‘प्रहार’चे आंदोलन तूर्त मागे, पालकमंत्र्यांची मध्यस्थी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : भाजप नेते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या कथित विधानाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून (ता.१०) पाण्याच्या टाकीवर सुरू केलेले आंदोलन तब्बल ३२ तासांनंतर शुक्रवारी (ता.१२) मागे घेण्यात आले. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी सांगितले कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून 'प्रहार’चे नेते, राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही पाठिंबा देत त्यात सहभागी झाले आहेत.

आंदोलनाची तीव्रता वाढलेली असतानाच दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचा हात असल्याचे विधान औरंगाबाद जिल्ह्यातील एका कार्यक्रमात नुकतेच केले होते. दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी 'प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढून कालपासून आंदोलन सुरू केले होते. थंडीत रात्रीही कार्यकर्ते टाकीवरच होते. आज सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू असताना पालकमंत्री देसाईंसोबत बैठक होणार असल्याचा निरोप जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यानुसार जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. तोपर्यंत उर्वरित आंदोलनकर्ते पाण्याच्या टाकीवरच होते.

शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी दिली. आठ दिवसांत आश्वासनपूर्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. बाळासाहेब भोसले, सुदाम शिंदे, संदीप बुवा आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कठोर कारवाई करा : हर्षवर्धन जाधव
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कठोर करावाई करण्याची मागणी करीत त्यांनी दानवे यांच्यावर तोफ डागली. आंदोलनकर्त्यासमवेत जाधव यांनी जेवण केले.
 

Edited - Ganesh Pitekar