
मुस्लिम समाजाच्या किसान बाग आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीयवादी राजकारणाला शह मिळेल.
औरंगाबाद : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीनबागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडी आणि विविध मुस्लिम संघटनांच्या वतीने २७ जानेवारी रोजी राज्यात ठिकठिकाणी किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाच्या किसान बाग आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीयवादी राजकारणाला शह मिळेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१६) पत्रकार परिषदेत केले.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या महिन्यात १७ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यात आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेत शाहीन बागच्या धर्तीवर एकदिवसीय किसान बाग आंदोलन करण्यात येणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी किसानबाग आंदोलनाचे राज्य समन्वयक फारूख अहमद, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, प्रभाकर बकले, योगेश बन, संदीप शिरसाट आदींची उपस्थिती होती.
विरोधकांना लकवा?
शेतकरी आंदोलनाला आज ५२ दिवस झाले आहेत. तरीदेखील या आंदोलनाला राजकीय विरोधी पक्षांसह सीपीआय, सीपीएम डाव्या पक्षांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. विरोधकांनी आक्रमकपणे शेतकऱ्यांची बाजू घ्यायला हवी होती. सध्याची परिस्थिती पाहता विरोधकांना लकवा मारला आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले.
नामांतरापेक्षा विकास करा
नामांतर केल्याने शहराचा पाणीप्रश्न सुटत असेल तर खुशाल शहराचे नामांतर करावे. तसेच शहराच्या नामांतरासाठी नागरिकांचे मतदान घ्यावे. जायकवाडी भरलेले असताना शहर कोरडे आहे. महापालिकेची निवडणूक शहराचा पाणीप्रश्न व इतर मूलभूत प्रश्न सोडविण्याच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांनी लस घेतल्यावरच मी घेणार!
कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली ही आनंदाची बाब आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतली तरच मीपण लस टोचून घेईन, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
Edited - Ganesh Pitekar