शिवाजीनगर भुयारी मार्गाचा तिढा सुटणार तरी कधी?

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : शहानूरमियॉं दर्गा परिसरातील संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वेच्या भुयारी मार्गाचा संग्राम दोन वर्षांनंतर अखेर यशस्वी झाला. मेट्रो असोसिएशनतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला; तसेच जनआंदोलन करण्यात आले. संग्रामनगरच्या यशस्वी संग्रामानंतर शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. या भुयारी मार्गाचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

सततच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना ज्वलंत प्रश्‍नासाठी आता वज्रमूठ एकवटून रस्त्यावर उतरल्याशिवाय भुयारी मार्ग पूर्ण होईल, अशी सुतराम शक्‍यता दिसत नाही. 

संग्रामनगरप्रमाणेच शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी या भागातील नागरिकांनीही जिल्हा प्रशासनासह रेल्वे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदने देऊन लक्ष वेधले आहे; परंतु अद्यापही शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचा प्रश्‍न या ना त्या तांत्रिक कारणांनी लालफितीतच अडकला आहे. 

त्रस्त नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटण्याआधीच भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल यापैकी तांत्रिकदृष्ट्या सोयिस्कर असलेला पर्याय निवडून प्राधान्यक्रमाने हा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा, अशी येथील लाखो नागरिकांची अपेक्षा आहे. 

टोलवाटोलवी अन्‌ चर्चेचे गुऱ्हाळ 

प्रत्येकवेळी आश्‍वासन आणि चर्चेचे गुऱ्हाळ, टोलवाटोलवी आणि शासकीय यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने भुयारी मार्गाचे काम अद्यापही थंड बस्त्यातच अडकले आहे. काही ना काही तांत्रिक अडचणींचा पाढा वाचत टोलवाटोलवीचे धोरण अवलंबिले जात असल्याने नागरिकांच्या ज्वलंत प्रश्‍नाला हरताळ फासला जात असल्याचे उघड-उघड जाणवते आहे. रेल्वे तसेच बांधकाम विभाग, महापालिकेकडेही दिमतीला आपापली तज्ज्ञ अभियंत्यांची फौज आहे.

भुयारी मार्गाच्या कामासाठी तज्ज्ञ अभियंत्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा जर उपयोगच होत नसेल तर दुर्दैव ते काय? शिवाजीनगर रेल्वेमार्गावरून सातारा, देवळाई पंचक्रोशीतील लाखो नागरिकांना येथून ये-जा करताना मरणयातनाच भोगाव्या लागतात. दर अर्ध्या तासाला गेट बंद होत असल्याने नेहमीच्याच वाहतूक कोडींमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पोलिसही बघ्याची भूमिका घेतात; मात्र याचे सोयरसुतक शासकीय यंत्रणांना नसल्याचे दिसत आहे. 

घोडं कुठे पेंड खाते? 

शहरातील तीन आमदार; तसेच विधानपरिषदेचे आमदार आणि जिल्ह्यातील विद्यमान मंत्र्यांनी शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी ठाकरे सरकारकडे आग्रही भूमिका मांडली तर हा प्रश्‍न चुटकीसरशी सुटू शकतो; तसेच विद्यमान खासदारांनाही या विषयावर संसदेत प्रश्‍न उपस्थित केला तरीही हे काम मार्गी लागू शकते; परंतु घोडं कुठे पेंड खाते आहे याचे कोडेच अद्यापही उलगडेना झाले आहे.

सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती, महिला कृती समिती सातारा-देवळाई संघर्ष समितीतर्फे बद्रीनाथ थोरात, पद्मसिंह राजपूत, तसेच सोमीनाथ शिराने, असद पटेल, आबासाहेब देशमुख, ऍड. शिवराज कडू पाटील आदी भुयारी मार्ग व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत; परंतु सर्वांची केवळ आश्‍वासनावरच बोळवण केली जात असल्याने आता रेल्वे रोको, रास्ता रोकोसह अन्य लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलनाशिवाय नागरिकांना दुसरा पर्याय उरलेला नाही.

येथील भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाचे काम जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत जनआंदोलनाची ही धग कायम तेवत ठेवावी लागणार आहे. असे केल्यासच अनेक वर्षांपासून लाल फितीत अडकलेल्या या समस्येचा तुकडा पडेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com