प्रियंकाची पोटासाठी भटकंती सुरु होती, त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. अखेर तिच्यासाठी आरोग्यसेविका बनल्या देवदूत

जमील पठाण 
Friday, 4 December 2020

मासेमारीच्या शोधात भटकंती करणाऱ्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसुती 

कायगाव (औरंगाबाद) : मासेमारीच्या शोधात भटकंती करीत कायगाव (ता. गंगापूर) परिसरातील गोदावरी नदी काठी आलेल्या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तिच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आरोग्य पथक देवदूत बनून काही क्षणात दाखल झाले. त्या आदीवासी महिलेचे यशस्वी बाळंतपण करून आई अन् बाळाचे प्राण वाचविले. आरोग्य पथकाच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचे परिसरात कौतुक होऊ लागले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत अधिक माहिती अशी की, कायगाव-अमळनेर शिवारातील गंगापूर वॉटर सप्लाय जवळ गोदावरी नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील सांवगी तलाव येथील दांपत्य एक वर्षापासून गोदाकाठी वास्तव्यास आहे. प्रियंका दिनेश भंडारे (25) पती दिनेश भंडारे या दाम्पत्याला एक पाच वर्षांची मुलगी, एक दोन वर्षांची मुलगी आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी दिनेश यांना प्रियंका मासेमारी करण्यासाठी मदत करतात. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गुरुवारी (ता.3) सकाळी 11 वाजता प्रियंका यांची प्रकृती खराब झाली. तिला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. दवाखान्यात नेण्यास वेळ कमी होता. अशात तिला प्रसूतीचा त्रास सुरू झाला. तेथील स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत आरोग्य कर्मचारी यांना माहिती दिली. तात्काळ  प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत नरवडे यांनी आरोग्य सेविका सुनंदा इंगळे, आशा सेविका आशा साळवे, रोसा ब्राम्हणे यांना त्या ठिकाणी पाठवून महिलेला औषधी उपचार करून सलाईन दिले. काही वेळानंतर त्या महिलेने एका तीन किलो वजनाच्या गोंडस बाळाला जन्मदिला. बाळ बाऴंतीण दोघेही सुखरूप आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोग्यसेविकांनी बनविले जेवण 
आरोग्य सेविका सुनंदा इंगळे, आशासेविका आशा साळवे, रोसा ब्राम्हणे यांनी त्या गर्भवती महिलेच्या सुखद बाळंतपणासाठी मदत केली. त्यानंतर घरात दुसरे कोणीही नसल्याने आरोग्यसेविकांनीच चुलीवर स्वयंपाक बनवून तिला खावू घातले. घरात नवीन बाळाचे स्वागत झाल्याने सर्वांनाच आनंद झाला. आरोग्य विभागाच्या या दुर्गांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: safe delivery of pregnant woman who went fishing hard work taken health workers