गुढीऐवजी उभारा भगवी पताका !

राजेभाऊ मोगल
Tuesday, 24 March 2020

गुढीपाडवा साजरा करताना जर आपण संतांना मानतो तर त्यांच्या आज्ञा पाळायच्या नाही का?, असे सवाल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकमेकांना केले जात होते; मात्र मागील तीन वर्षांपासून परिवर्तनवादी चळवळीने व्यापक स्वरूपात प्रबोधन केल्याने याचा परिणाम आता दिसून येत आहे. 

औरंगाबाद : ‘तोडले मी बंधन, गाडल्या त्या रूढी, माझ्या शंभुराजांच्या नावाने उभारा भगवी पताका लावून गुढी,’ अशा शुभेच्छांची देवाण-घेवाण करीत मागील तीन वर्षांपासून परिवर्तनवादी गुढी उभारण्यास सुरवात झाली आहे. यंदाही गुढीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र असलेले भगवे ध्वज गावोगावी लावावेत, असे आवाहन करण्यात आलेले आहे. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात...

घरासमोर गुढी उभारून पाडवा हा सण साजरा केला जातो; मात्र मागील काही वर्षांत झालेल्या परिवर्तनाने मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन असल्याने या दिवशी दु:ख पाळायला हवे, अशा भावना व्यक्‍त करण्यात आल्याने मोठा बदल झाला. गुढी हा शब्द संतांच्या अभंगांतून अनेक ठिकाणी आला आहे व त्याचा अर्थ भागवत धर्म किंवा वारकरी पंथातील भगव्या रंगाची एकपाती पताका असा आहे. 

हेही वाचा : कोरोनामुळे मिळेना शालेय पोषण आहार..  

त्यामुळे गुढीपाडवा साजरा करताना जर आपण संतांना मानतो तर त्यांच्या आज्ञा पाळायच्या नाही का?, असे सवाल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकमेकांना केले जात होते; मात्र मागील तीन वर्षांपासून परिवर्तनवादी चळवळीने व्यापक स्वरूपात प्रबोधन केल्याने याचा परिणाम आता दिसून येत आहे. 

हेही वाचा : हातावर शिक्का असलेला पाहुणा आला अन उडाला गोंधळ

या अनुषंगाने दोन दिवसांपासून आवाहन केले जात असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी नमूद केले. दरम्यान, कृषी संस्कृतीचा एक भाग असलेला पाडवा सण हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. पूर्वीपासून एक पाती भगवी पताका उभारली जायची; मात्र छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानानंतर गुढीचे विकृतीकरण झाले; मात्र हळूहळू सत्य समोर येत असल्याने सामाजिक परिवर्तन झालेले आहे. अलीकडे शिव व शंभुप्रेमी पूर्वीप्रमाणेच कृषी संस्कृतीचा सन्मान म्हणून भगवी पताका उभारत असल्याचे छावा मराठा संघटनेचे प्रा. चंद्रकांत भराट यांनी सांगितले. 

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

आपल्या घरातील व्यक्‍तीचा मृत्यू झाला तर आपण दुखवटा पाळतो की नाही? मग स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानदिनी आम्ही उत्सव कसे साजरे करायचे? त्यांची आठवण, त्यांच्या कार्याची जाणीव सर्वांना व्हावी, म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी महाराजांचे छायाचित्र असलेली भगवी पताका उभारली जाणार असल्याचे शिवाजी जगताप यांनी सांगितले. 

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The saffron flag will be set up instead of Gudi