सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात पुन्हा हलला पाळणा, ‘समृद्धी’वाघिणीने दिला पाच बछड्यांना जन्म

माधव इतबारे
Saturday, 26 December 2020

कोरोना संसर्गामुळे महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय नऊ महिन्यांपासून बंद असले तरी पर्यटकांसाठी गोड बातमी आहे. ‘समृद्धी’ या वाघिणीने शुक्रवारी (ता. २५) पहाटे पाच बछड्यांना जन्म दिला.

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय नऊ महिन्यांपासून बंद असले तरी पर्यटकांसाठी गोड बातमी आहे. ‘समृद्धी’ या वाघिणीने शुक्रवारी (ता. २५) पहाटे पाच बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या १४ एवढी झाली आहे. एप्रिल २०१९ मध्ये याच वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता. संपूर्ण मराठवाड्यासाठी एकमेव असलेल्या महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सर्वाधिक नऊ वाघ होते.

 

 

त्यात आणखी पाच वाघांची भर पडली आहे. शुक्रवारी सिद्धार्थ-समृद्धी यांच्यापासून पाच बछड्यांचा जन्म झाला. पाचही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना पशुवैद्यकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हीटर लावण्यात आले असून, सीसीटीव्हीमार्फत वॉच ठेवला जात आहे. वाघीण व बछड्यांच्या देखभालीसाठी २४ तास केअर टेकर नियुक्त करण्यात आला आहे. पिंजऱ्यात केअर टेकरशिवाय इतरांना प्रवेश नाही. या पाच बछड्यांमुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या १४ एवढी झाली असल्याचे प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.

 

एक डझन बछड्यांना दिला जन्म
समृद्धी या वाघिणीने आत्तापर्यंत तब्बल १२ बछड्यांना जन्म दिला आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबर २०१६ ला तिने एक नर, दोन मादी अशा तीन बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ ला समृद्धीने एक नर, तीन मादी अशा चार बछड्यांना जन्म दिला होता. आता पुन्हा पाच बछड्यांना तिने जन्म दिला आहे.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samruddhi Tigress Give Birth To Five Culfs Aurangabad News