नव्या वर्षात उघडणार संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा 

माधव इतबारे
Tuesday, 20 October 2020

नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात 

औरंगाबाद : सांस्कृतिक वारसा असलेले संत एकनाथ रंगमंदिर नूतनीकरणासाठी महापालिकेने बंद केले आहे. कोरोना विषाणूमुळे नाट्यगृह सध्या बंद असले तरी नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये नवे रंगमंदिर नाट्यप्रेमींसाठी खुले होण्याची शक्यता आहे. नूतनीकरणाचे काम सध्या अंतिम टप्यात आले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेवरून अनेक नाट्य कलावंतांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेला जाग आली. त्यानंतर देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र हे काम अत्यंत कासवगतीने सुरू होते. कामाची यादीही लांबत गेली. त्यामुळे नाट्यप्रेमींमधून पुन्हा एकदा नाराजीचा सुर उमटत होता. दरम्यान महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटीच्या निधीतून हे काम पूर्ण करण्याची प्रशासनाला सूचना केली. त्यानंतर कामाला गती मिळाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी मंगळवारी (ता. २०) संत एकनाथ रंगमंदिराच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी उपअभियंता ए. बी. देशमुख, विद्युत विभागाच्या मोहिनी गायकवाड, बांधकाम विभागाचे उपअभियंता तनपुरे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. खुर्च्या बसविण्याचे आणि अग्निशमन यंत्रणेचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून, रोहित्र बसविण्यासाठी २५ लाख रुपये महावितरणकडे भरण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेतून रंगमंचावरील व्यवस्थेच्या कामाची निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ही निविदा तातडीने काढण्याची सूचना पानझडे यांनी केली. काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, पडदा त्यानंतर उघडू शकतो, असे श्री. पानझडे यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sant Eknath Rangmandir to open in New Year Aurangabad news