esakal | मातीने वाचविले तब्बल दोन कोटी !  
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad.jpg

सफारी पार्क निविदा : निविदेची रक्कम झाली कमी 

मातीने वाचविले तब्बल दोन कोटी !  

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : माती परीक्षणामुळे सफारी पार्कच्या पहिल्या टप्प्यातील कामामध्ये तब्बल दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे. संरक्षण भिंत बांधणे व जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने माती परीक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मिटमिटा भागातील जमीन टणक मुरमाड असल्याचे समोर आल्याने निविदेचे दर कमी करण्यात आले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे १४७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शंभर एकर जागेला संरक्षण भिंत बांधणे व जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कामाची निविदा काढली जाणार आहे तर दुसऱ्या टप्यात अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, इमारती आणि प्राण्यांचे पिंजरे उभारणे अशा कामांचा समावेश असेल. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार पहिल्या टप्प्यातील काम १४ कोटी ९२ लाख रुपयांवर गेले होते. ही निविदा प्रसिद्ध करत असतानाच माती परीक्षण करण्याची संकल्पना समोर आली. याठिकाणी जमीन कशा प्रकारची आहे, हे कळल्यानंतरच पाया किती खोदायचा यासह इतर बाबी स्पष्ट होणार होत्या. माती परीक्षणानंतर येथील जमीन मुरमाड पद्धतीचे असल्याचे समोर आले. त्यामुळे निविदेची किंमत तब्बल दोन कोटींनी कमी झाली आहे. आता सुमारे १३ कोटी रुपयांची निविदा सीईओ तथा महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या मंजुरीनंतर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
९४ हजारांत माती परीक्षण 
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत माती परीक्षण करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे माती ओली असल्याने परीक्षणासाठी वेळ लागला; पण तब्बल दोन कोटी रुपये वाचल्याचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले. माती परीक्षणासाठी ९४ हजार रुपयांचा खर्च आल्याचे त्यांनी नमूद केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)