सहाच महिन्यांपूर्वी झाले लग्न; देशसेवेसाठी ड्यूटीवर गेला, अन्...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

नियतीच्या भांड्यात वेगळेच रसायण शिजत होतं. कर्तव्यावर असताना अचानक त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सबंध गावावर शोककळा पसरली. 

देवगाव रंगारी (जि. औरंगाबाद) : तो सैन्य दलात नोकरीला. सहाच महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं. पण, देशसेवेला प्राधान्य देत लग्नाच्या काहीच दिवसांनतर तो कर्तव्य बजावण्यासाठी ड्यूटीवर गेला. मात्र, नियतीच्या भांड्यात वेगळेच रसायण शिजत होतं. कर्तव्यावर असताना अचानक त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सबंध गावावर शोककळा पसरली. 

देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील रहिवासी असलेले ऋषिकेश अशोक बोचरे (वय २७) यांचा मंगळवारी भारतीय सीमेवरील लेह-लडाखमध्ये कर्तव्य बजाविताना अपघाती मृत्यू झाला. ऋषिकेश हे भारतीय सैन्यदलात सात वर्षांपासून कार्यरत होते. भारत-चीन सीमेवरील लेह-लडाख येथे सध्या त्यांची ड्युटी होती. कर्तव्य बजावत असताना मंगळवारी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ऋषिकेश हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, पत्नी, एक भाऊ, वहिनी, एक बहीण असा परिवार आहे. 
 
संसारही बहरला नाही
ऋषिकेश यांचे नोव्हेंबरमध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काहीच दिवसानंतर ते नोव्हेंबरमध्ये कर्तव्य बजावण्यासाठी गेले. दरम्यान, लॉकडाउन असल्याने त्यांना गावी येता आले नाही. अजून त्यांचा संसारही बहरला नव्हता. तोच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जिच्या सोबत आयुष्यभर राहण्याची शपत घेतली. तिला तो शेवटचं भेटूही शकला नाही. या घटनेमुळे सबंध गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी (ता. १३) दुपारी त्यांचे पार्थिव देवगाव रंगारी येथे आणले जाणार असल्याची माहिती मिळते. 
 
ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान 

दुचाकीस्वार ठार, पत्नी जखमी 
खुलताबाद, ता. १२ (बातमीदार) ः पळसवाडी (ता. खुलताबाद) येथील प्रकाश मोतीराम कुचे (वय ५२) यांच्या दुचाकीवर माकडाने उडी मारली. त्यामुळे कुचे दुचाकीवरून पडले. यात त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी संगीता जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (ता. १२) सायंकाळी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडली. 

संबंधित बातमी - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली

पळसवाडी येथील प्रकाश कुचे यांच्या पत्नी वेरूळ येथील वनविभागाच्या कामावर आहेत. नेहमीप्रमाणे काम आटोपले की कुचे हे त्यांना मोटारसायकलवर घेऊन जात असत. मंगळवारी ते पत्नीस घेऊन जात होते. वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर त्यांच्या दुचाकीवर (एमएच- २०, ईएस- १०८४) अचानक माकडाने उडी मारली. यात कुचे दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेली पत्नी संगीता या जखमी झाल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier Dies At India China Border Aurangabad News