Lockdown : कोरोनामुळे गुरू-शिष्य परंपरा ऑनलाइन 

Lockdown : कोरोनामुळे गुरू-शिष्य परंपरा ऑनलाइन 

औरंगाबाद : शास्त्रीय संगीताच्या गुरू-शिष्य परंपरेत समोर बसलेले शिष्य गुरुजींनी सा ऽ ऽ रेऽ ऽ ऽ गऽ असा स्वर लावला, की ते ही त्यांच्या पाठोपाठ स्वर लावताना दिसतात. मात्र, कोरोनानंतर ही गुरू-शिष्य परंपरा ऑनलाइन करण्याकडे कल झुकत आहे, काहींनी ऑनलाइन वर्ग सुरूही केले आहेत. मात्र शिष्यांना समोर बसवून संगीत शिकवतानाचा जिवंतपणा असतो, एक अटॅचमेंट असते ती त्यात जाणवणार नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. लॉकडाउनच्या निमित्ताने काही गायक कलाकारांनी नवीन रचना तयार केल्या आहेत. 

स्वरविहारचे प्रा. राजेश सरकटे म्हणाले, की कोरोना आला म्हणून त्याला न घाबरता त्याचा सामना केला पाहिजे. आरोग्य उत्तम असेल, रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोनाची भीती नाही. यासाठी लॉकडाउनच्या काळात योगासने, प्राणायाम करीत आहे. गाण्याचा रियाज करण्याशिवाय कोरोनाच्या अनुषंगाने चार गाणी तयार केली आणि ती गाऊन सोशल मीडियावर टाकली; तसेच संगीत हा विषय केंद्रबिंदू मानून एका मराठी चित्रपटाची लॉकडाउनपूर्वी कथा लिहिली होती. या काळात या चित्रपटासाठी चार गाणी लिहून काढली आहेत. 

नूरजहांच्या गझलेसह नवकवींची गाणी 

शास्त्रीय गायिका आरती पाटणकर म्हणाल्या, की लॉकडाउनमध्ये रियाज करायला भरपूर वेळ मिळाला. याशिवाय एका बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी ‘तुम राधे बनो श्‍याम’ ही पिलू रागातील पारंपरिक ठुमरी, नूरजहां यांची अतिशय दुर्मिळ ‘नियत शौक भर न जाऐ कही, तुम भी दिल से उतर न जाए कही’ ही गझल गाऊन दिली. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम वंदना गायली. साईनाथ फुसे या नवकवीने लिहिलेली दोन गाणी गाऊन दिली आहेत. शिवाय आता ऑनलाइन गाण्याचे क्लासचे नियोजन सुरू आहे. 

ऑनलाइनचा पर्याय 
शास्त्रीय गायक, संगीतकार जयंत नेरळकर म्हणाले, कोरोनामुळे सर्वजण घरातच आहेत. घरात राहून लोक कंटाळलेले आहेत. मात्र या संकटातूनही आपण बाहेर येऊ आणि पुन्हा पूर्वीसारखेच सर्वांचे जीवन सामान्य होईल अशा आशयाचे गाणे तयार करून ते विद्यार्थी व अन्य गायकांकडून गाऊन घेतले. याशिवाय इंग्रजी आणि हिंदी भाषांतील दोन गाणी तयार केली आहेत. कोरोनामुळे आता संगीताचे वर्ग ऑनलाइन घेण्याबाबत विचार सुरू आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांना रागांचे ऑडिओ, व्हिडिओ तयार करून देऊन त्यांना शिकवावे लागेल आणि त्यांच्याकडून मागवावे लागतील. मात्र समोरासमोर बसून विद्यार्थ्यांना शिकवतानाची जी अटॅचमेंट असते ती ऑनलाइनमध्ये तितकी राहत नाही. शिवाय ऑनलाइन शिकवताना व्यत्यय येतो. 

गाण्यावर लक्ष केंद्रित केले 
गायिका कविता वतनी करलगीकर म्हणाल्या, की लॉकडाउनमुळे खरे म्हणजे कलाकारांना खूप चांगली संधी मिळाली म्हणायला हरकत नाही. कोरोना काळातील निराशाजनक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी या काळात मी गायनावर जास्त लक्ष केंद्रित केले. गेल्या २५ वर्षांपासून माझा सकाळ, संध्याकाळ रियाजाचा नियम आहे. या काळात तो जास्त झाला. मित्र-मैत्रिणींच्या फर्माईशनुसार गाणी रेकॉर्ड करून पाठविली. यानिमित्ताने ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची ही संधी आहे असे वाटते. 

.
दाद कलाकाराला ऊर्जा देते 
आता लॉकडाउनच्या काळात गायनाचे डिजिटलवर कार्यक्रम होत आहेत. गाण्याच्या मैफली होत आहेत. त्यावर प्रतिक्रियाही येतात; मात्र रसिकश्रोत्यांकडून दिल्या जाणाऱ्या दादमध्ये जो जिवंतपणा असतो तो ऑनलाइनमध्ये नसतो. रसिकांकडून मिळणारी दाद गायकाला ऊर्जा देत असते, ही उणीव डिजिटलवर जाणवेल, असे श्री. नेरळकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com