Video : वडाच्या अध्यक्षतेखाली होणार देशातील पहिले वृक्षसंमेलन 

औरंगाबाद : वृक्ष संमेलनाविषयी माहिती देतांना अभिनेते सयाजी शिंदे, उपस्थित उपायुक्‍त शिवानंद टाकसाळे, महेश नामपुरकर, कृषीभूषण शिवराम घोडके, अरविंद जगताप आदी.
औरंगाबाद : वृक्ष संमेलनाविषयी माहिती देतांना अभिनेते सयाजी शिंदे, उपस्थित उपायुक्‍त शिवानंद टाकसाळे, महेश नामपुरकर, कृषीभूषण शिवराम घोडके, अरविंद जगताप आदी.

औरंगाबाद : वृक्ष संवर्धनाची भावना जनमानसात रुजविण्यासाठी, 
वृक्षाअभावी रूक्ष होत चाललेल्या वातावरणाला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने सह्याद्री देवराईच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील पालवण परिसरातील डोंगरावर येत्या 13 व 14 फेब्रुवारीला देशातील पहिले वृक्ष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे वृक्षाच्या सानिध्यात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपदही वडाच्या झाडाकडे असेल, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी येथे दिली.

या आगळ्या वेगळ्या संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी (ता.21) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे म्हणाले, सजीवांना जगण्यासाठी झाड जेवढे काही करू शकते, तेवढे कुणीच करू शकत नाही. तिथे उच, निच, गरीब, श्रीमंत असे काहीच नसते, झाड हे सर्वांना सारखाच ऑक्‍सीजन, सावली देते, म्हणून "झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेवू' या संकल्पनेने प्रेरीत होऊन या वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सह्याद्री देवराई ऍपचे लॉन्चींग 
वृक्षसंमेलनाबद्दलची सविस्तर माहिती जगभरातील वृक्षप्रेमींपर्यंत पोहचावी, वृक्षसंख्याची नोंद व्हावी, यासाठी सह्याद्री देवराई या ऍपचे लॉन्चींग सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. गुगल प्ले वरून हा ऍप डाऊनलोड करता येणार आहे.

वृक्ष संमेलन आयोजन करणे तसे धाडसच म्हणावे लागेल. परंतू हा वृक्षाप्रती जनजागृतीचा एक प्रयत्न आहे. अनादी काळापासून वृक्ष अविरतपणे माणसांसाठी काम करीत असतांना माणसं मात्र या वृक्षांच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे कोणत्याही वादात न पडता आपण काय करू शकतो, या भावनेतून सह्याद्री देवराईने पर्यावरण आणि निसर्गाचे जतन, संवर्धन तसेचे वृक्ष वृद्धीसाठीचे काम हाती घेतले आहे. आजवरच्या आपल्या कार्यकाळात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून 2 लाख 90 हजार 317 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातल्या मानदेश, नाशिक, बीड, नगर, सातारा जिल्ह्यात मानवनिर्मित देवराई उभ्या करण्यात आल्या आहेत. 11 जिल्ह्यात सह्याद्री देवराई परिवाराचे कार्य सुरू आहे. वृक्ष लावण्यापुरते मर्यादीत न राहता लावलेल्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना सह्याद्री देवराई परिवाराने पुढे आणली आहे. बीड जिल्ह्यातील पालवणच्या डोंगरावर आजपर्यंत जवळपास 1 लाख 64 हजार वृक्षांची लागवड केली आहे. त्यामध्ये तीन रॉक गार्डनचा समावेश आहे.

वृक्ष संमेलनाच्या संकल्पनेला मुर्त रूप देतांना पालवण परिसरातील पाच गावातून वृक्षदिंड्या काढल्या जाणार आहेत. संमेलनस्थळी असणाऱ्या स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक वृक्षांचे महत्व बीयांपासून वाढीपर्यंतचे अधोरेखीत करणारी माहिती दिली जाणार आहे. वृक्ष आणि वनसंपदेच्या विषयाचे राज्यभरातील जवळपास 20 तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहून जिज्ञासू विद्यार्थी व व्यक्‍तींना मार्गदर्शन करणार आहेत. जलव्यवस्थापनात वृक्षांची भूमिकाही यावेळी मांडलीं जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील विविध शाळा वृक्षाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी संमेलनस्थळी सहली काढणार आहेत. यानिमित्ताने "फोटो वॉक' चे ही आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून महत्वाच्या व आपल्या भागात उपलब्ध असणाऱ्या वृक्षांचे फोटो आपल्याकडे संकलीत होण्यास मदत होईल. वृक्ष संमेलनाच्या विविध पैलूंविषयी गीतकार अरविंद जगताप, उपायुक्‍त शिवानंद टाकसाळे, तरुण कृषीभूषण शिवराम घोडके, महेश नामपुरकर, नर्सरी असोसिएशनचे विनय शिंदे, संजय तांबे आदींनीही सविस्तर माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com