esakal | पैठण तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाचा गुंता सुटला; जुन्या वादातून हत्या केल्याची आरोपीने दिली कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

संपूर्ण जिल्हा हादरुन टाकलेल्या या तिहेरी निर्घृण हत्याकांडाचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिस निरीक्षक किशोर पवार, जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी राज्यातील अनेक मोठ्या शहरात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके पाठवून शोध घेतला.

पैठण तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाचा गुंता सुटला; जुन्या वादातून हत्या केल्याची आरोपीने दिली कबुली

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : जुने कावसन (ता.पैठण) येथील निवारे हत्याकांडात पकडलेल्या आरोपी अक्षय प्रकाश जाधव (वय २७)  याने जुन्या वादातून निवारे कुटुंबातील तीन जणांची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. दरम्यान आरोपीला पैठण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता.१३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली. जुना वाद कशातून घडला ही बाब पोलिस तपासात स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. पैठण शहरापासून जवळच असलेल्या जूने कावसन येथील राहत्या घरात या आरोपीने मध्यरात्री नंतर प्रवेश करुन राजु उर्फ संभाजी नारायण निवारे (वय ३५), अश्विनी संभाजी निवारे (वय ३०) या पती पत्नीसह नऊ वर्षीय मुलगी सायली या तिघांची हत्या ता.२८ नोव्हेंबर २०२० रोजी केली होती.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

या हत्येत तिघांच्या डोक्यावर, गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खुन केला. या घटनेत त्यांच्या सात वर्षाचा मुलगा सोहम ही गंभीर जखमी झाला होता. त्याच्या ही गळा व डोक्यावर शस्त्राने वार केले होते. परंतु दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. या घटनेनंतर आरोपीने मोबाईल बंद करुन फरारी झाला. यानंतर त्याने नाशिक, पुणे, मुंबई, जालना, औरंगाबाद आदी ठिकाणी काही काळ वास्तव्य करुन फिरत असल्याने तसेच रात्रीच्या वेळेत रोडच्या कडेला शेतात झोपत असे. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना आव्हान ठरले.

विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण सुरु; ग्रंथालय, वसतिगृहे, वर्ग अद्यापही बंदच 

शेवटी बुधवारी (ता.६) आरोपी हा विना क्रमाकांच्या मोटारसायकलने येवला येथून औरंगाबादकडे येत आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे वेग वेगळे पथके तयार करुन तसेच पोलीस ठाणे येवला, कोपरगाव, वैजापूर, विरगाव, गंगापूर, शिल्लेगाव, शिऊर व देवगाव रंगारी पोलीस ठाण्यास नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अक्षय प्रकाश जाधव याचा शोध घेत असताना तो महालगाव (ता.वैजापूर) येथे रोडने वैजापूरकडून गंगापुरकडे एका विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर येताना दिसल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे जवळील मोटारसायकल सोडून तो शेतात पळून जाऊ लागला.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

या दरम्यान, पैठण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जवळपास दोन किलोमीटर पाठलाग करुन अखेर पकडले. आरोपीचे ताब्यातून एक मोटारसायकल, एक मोबाईल हॅन्डसेट, एक चाकू , एक लोखंडी रॉड, एक सायकलची लोखंडी चैन असा एकुण ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरक्ष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या घटनेचा तपास केला.

हत्याकांडाचा ४० दिवसानंतर लागला तपास!
दरम्यान, संपूर्ण जिल्हा हादरुन टाकलेल्या या तिहेरी निर्घृण हत्याकांडाचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिस निरीक्षक किशोर पवार, जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी राज्यातील अनेक मोठ्या शहरात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके पाठवून शोध घेतला. परंतु या घटनेत पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाही. त्यामुळे पोलिस या घटनेतील आरोपीला जेरबंद करण्यासाठी डोळ्यात तेल घालून तपास केला व शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.
 

संपादन - गणेश पिटेकर