ह्रदयद्रावक : दोघी बहिणींचा नदीपात्रात बुडून मृत्यू, कन्नड तालुक्यातील खामगावावर शोककळा. 

सोमनाथ पवार 
Tuesday, 13 October 2020

दोन चुलत बहिणी पोहायला गेल्या असताना त्यातील एक जण बुडत असताना दुसरीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात दोघींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कन्नड तालुक्यातील खामगावात मंगळवारी (ता.13) सकाळी घडली.

औराळा (औरंगाबाद) : दोन चुलत बहिणी पोहायला गेल्या असताना त्यातील एक जण बुडत असताना दुसरीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात दोघींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कन्नड तालुक्यातील खामगावात मंगळवारी (ता.13) सकाळी घडली. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आरती कैलास कवडे (वय २२), ऋतुजा शिवाजी कवडे (वय१८) असे मृत बहिणींचे नावे आहेत.   

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

खामगावालगत असलेल्या नदीचे नुकतेच खोलीकरण रूंदीकरणाचे काम झाले आहे. त्यातच यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी आहे. या नदीपात्राच्या लगतच महादेव मंदिर असून सध्या सुरु असलेल्या धोंड्यांच्या महिन्यानिमित्त गावातील महिला देवदर्शनासाठी येतात. नेहमीप्रमाणे आरती व ऋतूजा या मंगळवारी (ता.13) सकाळी देवदर्शनासाठी गेल्या. आधी स्नान करु त्यानंतर देवदर्शन असे त्यांच्यात ठरले असावे. दोघीही नदीपात्रात उतरल्या. मात्र, एकीला पोहता येत नसल्याने ती बुडायला लागली. दुसर्या बहिणीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात दोघींचाही बुडून मृत्यू झाला.  

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ही घटना गावात कळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींना बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी औराळा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषित केले. औराळा आरोग्य केंद्रांतच दोघींचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने खामगाव गावावर शोककळा पसरली आहे. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे करीत आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

धोंड्याचा महिना विविध धार्मिक कार्यक्रम 
सध्या धोंड्याचा महिना सुरु आहे. त्यामूळे सकाळी लवकर उठून नदीवर स्नान करून देवदर्शनासाठी महिला जातात. यात नदीकाठी असलेल्या महादेव मंदिरात सकाळपासून देवर्शनासाठी महिलांची गर्दी होते. दोघी चुलत बहिणी नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी गेल्या आणि काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  

(संपादन- प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two sisters drown in river incident at Khamgaon news