नोटा बदलून घेण्याची थाप;  भामट्यांनी शेतकऱ्याला गंडविले 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 December 2019

नरसिंग शिवलाल चव्हाण हे बोकुड जळगाव (ता. पैठण) येथे राहतात. ते पंजाब नॅशनल बॅंकेत पैसे काढण्यासाठी आले. एक लाख पासष्ट हजार रुपये त्यांनी काढले. त्यावेळी दोनजण त्यांच्याजवळ आले. चव्हाण यांच्या हातातील एक नोट त्यांना दाखवली. या नोटेच्या सिरियलच्या नोटा बॅंकेकडून बदलून घ्या, असे सांगून त्यांनी लक्ष विचलित केले. त्यानंतर चव्हाण यांच्या सर्व नोटा स्वत:कडे घेत त्यातील बेचाळीस हजार परस्पर लांबवून उर्वरित नोटा चव्हाण यांच्या हाती टेकवून ते निघून गेले.

औरंगाबाद - शेतकऱ्याने बॅंकेतून पैसे काढल्यानंतर नजर ठेवून दोन भामट्यांनी नोटा बदलून घ्या, अशी त्यांना थाप मारली. नंतर त्यांच्या हातातून पूर्ण नोटा घेऊन त्यातील बेचाळीस हजार रुपये चलाखीने काढून उर्वरित रक्कम हाती टेकवून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (ता. 26) पंजाब नॅशनल बॅंक परिसरात घडली. 

नरसिंग शिवलाल चव्हाण हे बोकुड जळगाव (ता. पैठण) येथे राहतात. ते पंजाब नॅशनल बॅंकेत पैसे काढण्यासाठी आले. एक लाख पासष्ट हजार रुपये त्यांनी काढले. त्यावेळी दोनजण त्यांच्याजवळ आले. चव्हाण यांच्या हातातील एक नोट त्यांना दाखवली.

या नोटेच्या सिरियलच्या नोटा बॅंकेकडून बदलून घ्या, असे सांगून त्यांनी लक्ष विचलित केले. त्यानंतर चव्हाण यांच्या सर्व नोटा स्वत:कडे घेत त्यातील बेचाळीस हजार परस्पर लांबवून उर्वरित नोटा चव्हाण यांच्या हाती टेकवून ते निघून गेले. ही बाब काही वेळाने लक्षात आल्यानंतर त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

एकाची गळफास लावून आत्महत्या 

औरंगाबाद - राजेश तुळशीराम मेहरा (वय 50, रा. इंदिरानगर, गारखेडा) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नक्षत्रवाडी येथे गुरुवारी (ता. 26) सायंकाळी घडली. नक्षत्रवाडी येथे ते किरायाने राहत होते. त्यांनी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी सातारा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली. 

अरे बाप रे - Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात

महिला पोलिसाला धक्का 
देणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा 

औरंगाबाद - रस्त्यात रिक्षा थांबविल्यावरून महिला पोलिस कर्मचारी बोलत असताना त्यांना धक्का देऊन खाली पाडत चालकाने रिक्षासह धूम ठोकली. हा प्रकार गुरुवारी (ता. 26) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास पंचवटी चौकात घडला.

याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध (एमएच-20, डीसी-3617) छावणी पोलिस ठाण्यात धक्का देत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक हिवराळे करीत आहेत.

हृदयद्रावक - आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी 

 

संशयिताला पळण्यास 
मदत करणाऱ्यावर गुन्हा 

औरंगाबाद - संशयिताला पकडण्यासाठी पोलिस गेल्यानंतर त्याला सतर्क करून पळवून लावणाऱ्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 26) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याबाबत जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी तक्रार दिली.

ते मोहम्मद इम्रान मोहम्मद लतीफ याला अटक करण्यासाठी बारी कॉलनी येथे गेले होते. त्यावेळी अक्रमखान अजमलखान (वय 31, रा. रोशनगेट) या रिक्षाचालकाने आरडाओरड करून मोहम्मद इम्रान याला पळून जाण्यास मदत केली. अशा तक्रारीनुसार जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा - धड होते रेल्वेपटरीवर, शिर मात्र गायब!

लेखापरीक्षकाच्या कार्यालयातून सीपीयूची चोरी 

औरंगाबाद - सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षक असलेल्या खाजा अशरफ अकील यांच्या कार्यालयातून सीपीयू चोरी झाला. ही घटना बुधवारी (ता. 25) सायंकाळी सातनंतर घडली. कार्यालयाचे कुलूप तोडून चोरांनी हा प्रकार केला. खाजा अशरफ अकील यांच्या तक्रारीनुसार क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

संशयावरून एकाला पकडले 

औरंगाबाद - चोरीसाठी दडून बसल्याच्या संशयावरून पाठलाग करून एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी (ता. 25) रात्री पाऊणेनऊच्या सुमारास राधास्वामी कॉलनीत घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मुकेश अशोक वाघुले असे संशयिताचे नाव आहे.  

शहरातून चार दुचाकी लांबविल्या 

औरंगाबाद - शहरातील विविध भागांतून चोरांनी चार दुचाकी लंपास केल्या. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 25) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. प्रकाश लालचंद हनवते (रा. भीमनगर, भावसिंगपुरा) यांची दुचाकी चोराने बुधवारी लंपास केली.

ही घटना सत्यविष्णू हॉस्पिटलच्या भिंतीलगत हडको, एन-11 येथे घडली. मोहम्मद सोहेल अहेमद खलीलोद्दीन (रा. वाहेद कॉलनी, रोशनगेट) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना जुनाबाजार येथील सोहेल डेंटल क्‍लिनिक येथील पार्किंगमध्ये घडली. शंकर विश्‍वनाथ महाजन (रा. सहयोगनगर, उल्कानगरी) यांची दुचाकी चोराने हॅंडल लॉक तोडून लंपास केली. ही घटना मंगळवारी त्यांच्या घराजवळील पार्किंगमध्ये घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

हेही वाचा - काय भयानक अनुभव आला या शिक्षिकेला वाचा...

सुनील नान्हूसिंग राठोड (रा. छत्रपतीनगर, सातारा) यांची बुलेट चोराने लंपास केली. ही घटनाही मंगळवारी राठोड यांच्या घरासमोर घडली. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

 
पॅरोलवर सुटलेला कैदी 
कारागृहात न परतल्याने गुन्हा 

औरंगाबाद - संचित रजेवर (पॅरोल) गेलेला कैदी कारागृहात परतला नाही. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुरुवारी (ता. 26) सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख अश्‍पाक शेख हसन (रा. मिसारवाडी) असे कैद्याचे नाव आहे.

तो खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा हर्सूल कारागृहात भोगत आहे. त्याने संचित रजेसाठी अर्ज केला होता. त्याला चार आठवड्यांची संचित रजा मंजूर झाली. 25 डिसेंबरला संचित रजेची मुदत संपल्यानंतर तो कारागृहात येणे बंधनकारक होते; पण तो हजर झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी कारागृहातील पोलिस शिपाई गजानन चव्हाण यांच्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

 
सिडको एन- एकमध्ये घरफोडी 

औरंगाबाद - सिडकोतील एन- एक भागात चोरांनी घर फोडून रोख रकमेसह नऊ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना 15 डिसेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान घडली. किरण प्रभाकरराव देशपांडे यांनी याबाबत तक्रार दिली. ते मेहुण्याच्या मुलीच्या लग्नासाठी सातारा येथे कुटुंबीयांसोबत गेले. त्यानंतर चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून रोख अडीच हजार व चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened in Aurangabad crime News