भटक्‍यांचे जीवन स्थिरावणार कधी?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - देश, राज्य प्रगती करीत असल्याचे दररोज दावे केले जात असतानाच दोनवेळेला पोट भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला पाल टाकून कष्ट उपसणारेही दररोज पाहायला मिळतात. देशाला स्वातंत्र्य मिळून मोठा काळ लोटला असताना भटक्‍यांच्या पदरी आजही भाकरी अन्‌ कामाचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे यांचे जीवन कुठे आणि कधी स्थिरावणार आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. 
आज महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून त्या - त्या क्षेत्रात सर्वोच्च पदांवर पोचत आहेत. यावरूनच प्रगती झाल्याचे दावे केले जातात. मात्र, गावगाड्यात बारा बलुतेदार कुठे आहेत, याचा शोध घेण्याचे काम कुणीही करीत नाही. त्यामुळे पारधी समाजासह अन्य भटक्‍यांची अवस्था न विचारलेलीच बरी. ना जमीन, ना नियमित रोजगार, आम्ही तर वडिलोपार्जित अशिक्षित बेरोजगार, अशी अवस्था आजही भटक्‍यांची आहे. शासनाच्या योजनांचा लाभ तर दूरच, साधे आधार कार्डही यांच्यापर्यंत पोचले नसून कसले "आधार', आम्ही तर रस्त्यावरचे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निराधार अशा शब्दांत ते दु:ख मांडतात. 

योजनांपासून कोसो दूर 
शासनाच्या योजना, घोषणा या त्यांच्यापासून कोसो दूरच आहेत. रस्त्याच्या कडेला पाल उभारत घर थाटायचे, मिळेल ते काम करून त्या मोबदल्यात मिळालेल्या पैशांत गुजराण करायची, हे जन्माला आल्यापासून ठरलेलेच. त्यामुळे आजही भटके, पारधी, शिकलकरी यांच्यासह उपेक्षित मंडळी भाकरीच्या शोधात फिरताना पाहायला मिळत आहेत. 

दोन दिवस पुरेल एवढेच भाकरीचे पीठ
बीड बायपास येथे एमआयटी महाविद्यालयाच्या जवळ मागील 15 वर्षांपासून भटके राहतात. सुरवातीला दहा झोपड्या थाटल्या होत्या. आता जवळपास 60 ते 70 झोपड्या झाल्या आहेत. या ठिकाणी राहणाऱ्यांच्या घरात दोन दिवस पुरेल एवढेच भाकरीचे पीठ सापडेल, अशी यांच्या स्वयंपाकसाठी लागणाऱ्या साहित्याची स्थिती. इकडून - तिकडून सरपण आणायचे आणि चूल पेटवून थोडेबहुत आणलेल्या साहित्याद्वारे पोट भरायचे, अशी स्थिती येथे बघायला मिळते. काहीजण तर दिवसभर भीक मागण्यासाठी शहरातील विविध स्पॉटवर दिवसभर एक - एक रुपया जमा करतात. या ठिकाणी असलेले चितोडिया कुटुंब जडीबुटीचे साहित्य विकतात. तर त्यांच्याच घरातील काहीजण भिरभिरे तयार करून घर चालविण्यास मदत करतात. त्यांच्या घरातील एकच आशादायी बाब म्हणजे घरातील लहान लेकरं शिकायला लागली आहेत. 
शहरातील गजानन महाराज मंदिर ते सेव्हनहिल रस्त्यावर डाव्या बाजूला गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ हातावर पोट असणारे कष्टकरी आहेत. ही मंडळी लाकडी देवघर, पाटा-वरवंटा, देवांच्या दगडी मूर्ती, छोटी मंदिरे, पोळपाट तयार करतात. हाताला घट्टे पडल्याशिवाय, देवदेवतांच्या मूर्तींना आकार येत नाही. त्यानंतर त्यास विकत घेणारा आला तरच देव पावला असे म्हणता येते; मात्र कधी कधी तर दिवसभरात बोहणीही होत नाही, अशी खंतही हे भटके व्यक्‍त करीत आहेत. 

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com