औरंगाबाद : काकाने केला पुतण्याचा खून, मेहेगावची घटना

Youth Murdered in Mehegaon
Youth Murdered in Mehegaon

पिशोर (जि. औरंगाबाद) - मेहेगाव (ता. कन्नड) येथे चुलत्याने पुतण्याचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. आठ) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. अक्षय एकनाथ घुगे (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. पिशोर पोलिस ठाण्यात चुलत्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार मेहेगाव येथे आपल्या शेतात अक्षय एकनाथ घुगे याचे वडील एकनाथ गंगाराम घुगे आणि चुलते जगन्नाथ गंगाराम घुगे हे दोघे उभे होते. त्या ठिकाणी येऊन अक्षयने चुलता जगन्नाथ घुगे यास ‘तुम्ही बांध का फोडला? अशी विचारणा केली.या वादातून दोघांमध्ये झटापट झाली. जगन्नाथने हातातील फावडे अक्षयच्या छातीत, डोक्यात मारल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव, सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार, फौजदार विजय आहेर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत अक्षय याचे वडील एकनाथ गंगाराम घुगे यांच्या फिर्यादीवरुन पिशोर पोलिस ठाण्यात जगन्नाथ गंगाराम घुगे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश पवार, पोलिस नाईक संदीप कनकुटे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


खाली वाचा औरंगाबादच्या इतर गुन्हेवृत्त

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या 
औरंगाबाद :
गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना ६ जून रोजी रात्री उघडकीस आली. मजूर सुरजित बिहारीलाल ठाकूर (४०, रा. शिवपुरी कॉलनी, पडेगाव) यांची पत्नी दोन महिन्यांपासून मुलीसह माहेरी जळगाव येथे गेलेली आहे. त्यामुळे ठाकूर हे घरात एकटेच होते. ६ जून रोजी त्यांनी वरच्या मजल्यावरील दुसऱ्या क्रमांकाच्या खोलीत सिलिंगच्या हुकाला दोरी अडकवून गळफास घेतला. हा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यावरून त्यांनी भाऊ रंगीन ठाकूर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना खाली उतरवून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास छावणीचे पोलिस नाईक शिंदे करत आहेत. 

तर मोहन प्रेमराज सरोदे (३५, रा. साई कॉलनी, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) यांनी ७ जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला. त्यांना वडील प्रेमराज सरोदे यांनी घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद मुकुंदवाडी पोलिसांत करण्यात आली.

जुन्या भांडणातून कुटुंबांत मारहाण 
औरंगाबाद :
जुन्या भांडणातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी पहाटे कोकणवाडी भागातील मारुती मंदिराजवळ घडली. रमेश महादू तांबे आणि मनोहर रामदास लोखंडे या दोन्ही कुटुंबांत जुना वाद आहे. या वादातून दोन्ही कुटुंबे रविवारी पहाटे समोरासमोर आली. यावेळी मनोहर लोखंडे यांना आमच्याविरोधात पोलिसांत तक्रार का करतो असे म्हणत नितीन रमेश तांबे, रमेश तांबे, रोहिदास रमेश तांबे, गणेश तांबे, लड्डाअप्पा तांबे व दोन महिलांनी शिवीगाळ, मारहाण केली. तर मनोहर लोखंडे, रोहित लोखंडे यांनीदेखील तांबे कुटुंबीयांना मारहाण केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 
   
शटर उचकटून रोख, किराणा लंपास 
औरंगाबाद :
दुकानाचे शटर उचकटून चोरांनी रोखीसह किराणा साहित्य लंपास केले. ही घटना रविवारी सकाळी जुना मोंढा भागात उघडकीस आली. विष्णुकांत केदारनाथ दरख (५४, रा. एन-३, सिडको) यांचे जुना मोंढा भागात केदारनाथ मुरलीधर दरख नावाचे किराणा होलसेल व किरकोळ विक्रीचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री चोरांनी त्यांच्या दुकानाचा छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरांनी गल्ल्यातील ४० हजारांची रोकड, काजू, बदाम, विलायची, केशर, ब्लेडस याशिवाय इतर साहित्य असा ५० हजारांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....
 
तरुणीचा विनयभंग 
औरंगाबाद :
दुचाकीवर भाजीपाला आणि किराणा सामान घेऊन आकाशवाणीकडून घराकडे जाताना तरुणीला अडवत तिचा हात धरून मवाल्याने स्वत:कडे ओढले. यावेळी घाबरून गेलेल्या २४ वर्षीय तरुणीने घडलेला प्रकार भावंडांना सांगितला. त्यामुळे भावंडे जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सागर साखरे याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार सोनवणे करत आहेत. 
  
रिक्षा चोरीला 
औरंगाबाद :
घरासमोर उभी असलेली रिक्षा चोरांनी मध्यरात्री लांबविल्याची घटना ५ जून रोजी सकाळी उघडकीस आली. राहुल श्रीरंग बोरुडे (३०, रा. एकतानगर, जटवाडा रोड) यांनी लॉकडाउनमुळे घरासमोर रिक्षा (एमएच-२०-ईएफ-७८७६) उभी केली होती. त्यांची रिक्षा बनावट चावीच्या साहाय्याने चोराने लांबविली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
क्षुल्लक कारणावरून हाणामारी 
औरंगाबाद :
क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारीची घटना घडली. बाबूराव त्रिभुवन (६२) आणि प्रशांत दिवाकर निकाळजे (२८, दोघेही रा. प्रतिज्ञानगर, विटखेडा) यांच्यात जोरजोरात आरडाओरड का करता, तुमच्या घरासमोर जाऊन बोला. तसेच आमच्या घरासमोर यायचे नाही या कारणावरुन भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर शिवीगाळ व हाणामारीत झाले. यावेळी प्रशांत निकाळजे, विशाल निकाळजे, बाबूराव त्रिभुवन, सचिन बाबूराव त्रिभुवन, विक्रम त्रिभुवन व प्रशांत त्रिभुवन हे जखमी झाले. या दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com