काय सांगता ! ६२ लाख मिळाले हो, पण तरीही इथंच घोड पेंड खातय !

zp office.jpg
zp office.jpg

औरंगाबाद  : हो हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरच आहे. भूसंपादनाचे तब्बल ६२ लाख रुपये राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून मिळाले. परंतु तरीही इथेच घोडं पेंड खात असल्याने कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा तिढा काही अजूनही सुटता सुटेना. यासाठी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार आणि संजय खंबायते यांचा प्रशासनाकडे अविरत पाठपुरावा सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामामध्ये अडथळा ठरत असल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने शाळा पाडून शाळेची जागा अधिग्रहित केली. व जागेच्या बाजार भावाप्रमाणे भूसंपादन करून तब्बल ६२ लाख रुपये शाळेला दिले. मात्र गावामध्ये नवीन ठिकाणी शाळा बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे शासकीय गायरान जमीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे गावातील एका शेतकऱ्याने शाळेला जमीन विक्री करण्याचे मान्य केले . त्या शेतकऱ्याकडून जागा विकत घेतली. 

परंतु शाळेत ये जा करतांना विद्यार्थी, पालक तसेच जेष्ठ नागरिकांना हा धोकादायक महामार्ग ओलांडून जातांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागेल. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गावर फूटवेअर ब्रिज करावा (एफओबी) यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना पत्र द्यावे व तात्काळ टापरगाव येथे फुटवेअर ब्रिज तयार करावा असा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधिकरणाला द्यावा असा प्रस्ताव  किशोर पवार यांनी  नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मांडला. 

प्रस्तावाला उपस्थित सर्व सदस्यांनी मान्यताही दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील टापरगाव येथे जिल्हा परिषद शाळेसाठी शासकीय जमीन शिल्लक नसल्याची अडचण लक्षात घेऊन खाजगी मालकाकडून जागा विकत घेण्याच व त्या जागेवर शाळेची इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली असल्याचे किशोर पवार यांनी सभागृहात बोलतांना सांगितले. परंतु धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून मुलांना रोज शाळेत ये-जा करणे अतिशय जिकिरीचे ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला. यापूर्वी देखील संबंधित यंत्रणेकडे आपण अंडरपास करावा अशी मागणी केली होती. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता फुटवेअर ब्रिज करावा यासाठी प्रशासनाने त्वरित पत्रव्यवहार करावा असा प्रस्ताव किशोर पवार सभागृहासमोर ठेवला .  

डॉ.गोंदावले यांनीही केली तात्काळ अंमलबजावणी 
किशोर पवार यांच्या मागणीला अखेर यशही आले. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये किशोर पवार यांनी  महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फुटवेअर ब्रिज साठी पत्र द्यावे अशी मागणी केली होती. व तसा प्रस्तावही सभेत मंजूर झाला होता. याची तात्काळ दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी देखील प्रशासनाची कार्य तत्परता दाखवून देत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना (एफओबी) साठी पत्र दिल्याची माहिती किशोर पवार यांनी "सकाळ" शी बोलताना दिली.    

खा. डॉ. भागवत कराड यांनीही राजमार्ग प्राधिकरणाला दिले पत्र 
टापरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची समस्या घेऊन किशोर पवार आणि जिल्हा परिषद सदस्य संजय खंबायते यांनी राज्यसभेचे सदस्य खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांनाही सदर शाळेची  समस्या सांगितली. खासदार कराड यांनी देखील राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांना ( ता. २४ ऑगस्ट) रोजी पत्र देऊन टापरगाव येथे पादचारी पूल (एफओबी) करून देण्याची शिफारस केली आहे. गावातील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागते त्यामुळे मौजे टापरगाव येथे पादचारी पूल तत्काळ मंजूर करावा अशी शिफारस या पत्राद्वारे खासदार डॉक्टर कराड यांनी केली आहे. आता यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण काय कार्यवाही करते याकडे टापरगाव येथील नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com