esakal | मराठवाड्यातील २० लाख शेतकऱ्यांना मिळाले अनुदान
sakal

बोलून बातमी शोधा

300help_0.png

३० टक्के शेतकऱ्यांना प्रतीक्षा : बीडमध्ये केवळ ९ टक्के वाटप 

मराठवाड्यातील २० लाख शेतकऱ्यांना मिळाले अनुदान

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २० लाख ७२ हजार ६३८ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३०० कोटी पैकी ९३६ कोटी एवढे अनुदान जमा केले आहे. मात्र अद्यापही ३० टक्के शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, नांदेड जिल्ह्यात शंभर टक्के तर बीड जिल्ह्यात केवळ ९.४९ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुग, उडीद, सोयाबिन, कापशीसह इतर पिकांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. प्रशासनाने पंचनामे केले असता ३५ लाख ६९ हजार ४०० शेतकऱ्यांच्या २४ लाख ९५ हजार ९०१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. नुकसान भरपाईची मदत दिवाळीपूर्वी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक जिल्ह्यात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोचलेली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरडवाहू व बागायत क्षेत्रासाठी सरसकट १० हजार रुपये हेक्टर (दोन हेक्टर मर्यादा) तर फळपिकांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी (दोन हेक्टर मर्यादा) मदत करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. औरंगाबाद ४०.४० टक्के, जालना ७४.१२, परभणी ५४.८३, हिंगोली ५९.२१, नांदेड १००, बीड ९.४९ लातूर ९८ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९२.५८ टक्के अनुदान वाटप करण्यात आले आहे. दरम्यान दिवाळीनिमित्त बँकांना सुट्टी असल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)