हृदयविकाराने उमरग्यात २१५ जणांचा मृत्यू 

अविनाश काळे 
Tuesday, 27 October 2020

  • कोरोनाने घेतला तालुक्यातील ५७ जणांचा बळी. 
  • ६० कोरोना बाधित, संशयित व्यक्तीवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

उमरगा : शहर व तालुक्यात सात महिन्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. बाधितांची संख्येने दोन हजारांचा आकडा ओलांडला. आता संसर्ग आटोक्यात आला आहे. मात्र, कोरोनाने ५७ जणांचा बळी घेतला आहे. कोविडच्या नियमावलीप्रमाणे नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी आतापर्यंत बाधित व संशयित अशा ६० व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत. दरम्यान, दुर्धर आजाराने पीडित असलेल्या व अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने २१५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा विळखा पहिल्या टप्प्यात अगदी कमी होता. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात रुग्ण वाढत गेले. उपचार करूनही यश मिळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागते. कोरोनाग्रस्ताचा पहिला मृत्यू मे महिन्यात बेडग्याच्या एका ज्येष्ठ नागरिकाचा झाला. त्यानंतर मृत्यूदरही वाढत गेला. कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोविड रुग्णालयाचे पत्र प्राप्त होताच मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर आरोग्य विभागाला अंत्यसंस्कारासाठी तयार राहण्याच्या सूचना देतात. आरोग्य निरीक्षक एम. आर. शेख कामगारांसाठी पीपीई किट्स आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक ते साहित्याची जोडणी करून देतात.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सामाजिक कार्यकर्ते विजय (काका) जाधव यांनी पालिकेला शववाहिकेची व्यवस्था करून दिली आहे. राजू सौंदर्गे, शाहूराज कांबळे, धनराज सुरवसे, संतोष कांबळे, दगडू माने, उद्धव कांबळे, शववाहिका चालक निखिल मोरे आदी मोठ्या जोखिमेतून अंत्यसंस्काराचे सोपस्कर करण्याचे काम आतापर्यंत केले आहे. एकूण साठ व्यक्तींपैकी जवळपास पन्नास व्यक्ती या बाधित होत्या. तर दहा व्यक्ती कोरोना संशयित होत्या. मृत्यूमध्ये पुरुषांची संख्या ४५ तर स्त्रियांची संख्या पंधरा इतकी आहे. कठीण काळात कामगारच मृत व्यक्तीचे नातेवाईक होऊन केलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे. दरम्यान, सोलापूर, लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याच ठिकाणी मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दुर्धर आजार अन् कोरोनाची भीती 
कोरोनाचा संसर्ग मार्च महिन्यात सुरू झाला. उमरगा तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर कमी -अधिक प्रमाणात संसर्ग सुरू झाला आणि कोरोनाची भीती सर्वांत जास्त ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झाली. अस्थमा, मधुमेह, रक्तदाब आदी आजार असलेल्यांमध्ये कोरोनाची भीती वाढत गेली. त्यात हृदयविकाराचा झटका अनेकांना आला. त्यात जवळपास २१५ जण मृत्यूच्या दाढेत गेले. एप्रिल महिन्यात २२, मेमध्ये ३६, जूनमध्ये ४२, जुलैमध्ये ३१, ऑगस्टमध्ये ३० तर सप्टेंबर महिन्यात ४३ जणांचा मृत्यू झाला असून ही आकडेवारीची महिन्याची आहे. त्याची नोंद नगरपालिकेत आहे. 

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 215 people die of heart attack seven months Umarga news