Coronavirus : बीड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही तीन कोरोना बळी

24 new Covid cases In Beed District
24 new Covid cases In Beed District

बीड : नेहमीप्रमाणे मध्यरात्री थ्रोट स्वॅबचे अहवाल आले आणि पुन्हा २४ रुग्णांची भर पडली. मागील काही दिवसांपासून सुरू झालेली संपर्कातून संसर्ग साखळी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. त्यात भर म्हणजे सोमवारी (ता. २०) सकाळी कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, याच दिवशी दुपारी परळीतील एका शिक्षकाचा औरंगाबादेत मृत्यू झाला. शिवाय अन्य एका रुग्णाचाही बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळीची संख्या १७ झाली आहे. 

गेवराई शहरातील ३२ वर्षीय महिला शनिवारी (ता. १८) जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. गंभीर आजारी महिलेचा थ्रोट स्वॅब घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. रविवार - सोमवारच्या मध्यरात्री या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला. सोमवारी सकाळी या महिलेचा मृत्यू झाला. रविवारीही याच तालुक्यातील केकतापांगरी येथील महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर, बीड शहरातील तरुणाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर, परळी पेठ मोहल्ला येथील ४० वर्षीय शिक्षकाला ता. १३ जुलै रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. सुरुवातीला अंबाजोगाई व नंतर औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी त्यांचाही मृत्यू झाला. या दोन दिवसांत पाच कोरोना बळी तर आतापर्यंतचा १७ बळी गेले आहेत. 

आणखी २४ कोरोनाग्रस्तांची भर; केजमध्ये संपर्कसाखळी 
सोमवारी रात्री एक वाजता आलेल्या थ्रोट स्वॅब अहवालात जिल्ह्यात नवीन २४ कोरोनाग्रस्त आढळले. यामध्ये केज शहरातील एकासह होळला तीन व कळंअंबाला एक असे पाच कोरोना पॉझिटीव्ह आढळले. विशेष म्हणजे पाचही रुग्ण कोरोनाग्रस्ताच्या सहवासातील आहेत. बीड शहरातही नऊ रुग्ण आढळल. परळीतील दोघांपैकी एक रुग्ण सहवासातील आहे. अंबाजोगाईतील दोन रुग्णांपैकी एक महिला रुग्ण बार्शीहून आलेली आहे. गेवराई शहरात दोन आणि उमापूर व मालेगावला प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पाटोदा तालुक्यातही करंजवन व काकडहिराला प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला. या २४ रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५५ वर पोचला आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा
 
आणखी पाच कोरोनामुक्त 
सोमवारी आणखी पाच रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १४२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर औरंगाबाद, पुणे, मुंबई व अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत. 
 
एसपी पोद्दार पुन्हा क्वारंटाईन; गार्ड पॉझिटीव्ह 
दरम्यान, बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार पुन्हा एकदा होम क्वारंटाईन झाले. त्यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर श्री. मुंडे यांच्या बंदोबस्तातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कामुळे ते होम क्वारंटाईन झाले होते. आता त्यांच्या रक्षकालाच बाधा झाली आहे. हा रक्षक मागील सहा दिवसांपासून एसपींच्या शासकीय बंगल्यावर कार्यरत होता. त्यामुळे ते कुटूंबियांसह क्वारंटाईन झाले. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग
 
दरोडा प्रकरणातील आरोपही पॉझिटीव्ह 
सोमवारी आढळलेल्या कोरोनग्रस्तांमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीतील पकडलेल्या आरोपींमधील एकाला कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले. ता. १४ रोजी बीड ग्रामीण पोलिसांनी माळापूरी शिवारामध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी ताब्यात घेतली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. या आरोपीच्या संपर्कात पोलिस आलेले आहेत.  सदरील कोरोनाग्रस्त आरोपी सध्या मुलींच्या वस्तीगृहामध्ये उभारण्यात आलेल्या तात्पूरते जेलमध्ये आहे. 
 
दोन पालिकांचा चार्ज असलेल्या मुख्याधिकाऱ्यालाही लागण 
जिल्ह्यातील एका नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अन्य एका नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचाही पदभार आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईत उपचार सुरु आहेत. त्यांचा कर्मचाऱ्यांसह काही नगरसेवकांशीही संपर्क आलेला आहे. 

(संपादन : माधव इतबारे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com