साडेबारा कोटींचे प्रस्ताव लालफितीत, लातूर महापालिकेचे मंजुरीकडे लक्ष

हरी तुगावकर
Tuesday, 22 December 2020

केंद्र शासनाच्या अमृत पाणीपुरवठा योजनेतून बचत झालेल्या रक्कमेतून पाणीपुरवठ्याच्या संदर्भातीलच महत्त्वाची कामे करण्यास मंजुरी द्यावी या बाबतचे सुमारे साडे बारा कोटींचे प्रस्ताव लातूर महापालिकेने शासनाकडे पाठवले आहेत.

लातूर : केंद्र शासनाच्या अमृत पाणीपुरवठा योजनेतून बचत झालेल्या रक्कमेतून पाणीपुरवठ्याच्या संदर्भातीलच महत्त्वाची कामे करण्यास मंजुरी द्यावी या बाबतचे सुमारे साडे बारा कोटींचे प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवले आहेत. हे सर्व प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकले आहेत. शासनाने या प्रस्तावांना मंजुरी दिली तर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातील महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत.

 

अमृत योजनेत ३१ कोटी १९ लाखांची स्थापत्य कामे प्रस्तावित होती. स्थापत्य कामाची निविदा अंतिम करून कामाचे २३ कोटी ७७ लाखाच्या कामाचे आदेश देण्यात आले होते. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे ही कामे करता आली नाहीत. त्यामुळे याकामात ८ कोटी २३ लाखाची बचत झाली आहे. यातून शहरातील अत्यावश्यक असलेले पाइपलाइन, व्हॉल्व्ह व आनुषंगिक कामे करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे; तसेच अमृत योजनेत वरंवटी जलशुद्धीकरण केंद्र, हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्र, आर्वी जलशुद्धीकरण केंद्र येथे पंपिंग मशीनरी व संलग्न कामे प्रस्तावित होती.

 

 

 

 
 

यात आर्वी व हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, वरवंटी येथे जलशुद्धीकरण केंद्र हे जुने झाले असल्याने ते पाडण्याची सूचना स्ट्रक्टचरल ऑ़डिटमध्ये झालेली आहे. त्यामुळे २.२१ कोटी रुपयांची बचत
झाली आहे. धनेगाव हेडवर्क्स, हरंगूळ येथील पंपसेट व संलग्न साहित्य बसवणे, ८० एमलडीची पपिंग मशीन बसवणे, येथील इलेक्ट्रीकल मेकॅनिकल उपकरणे बदलणे अशी कामे करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्थळ पाहणी करून एक कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रकही तयार केले आहे. याचाही प्रस्ताव लालफितीत अडकला आहे.

 

 

यांत्रिकी कामाच्या निविदा अंतर्गत स्काडा व ॲटोमेशन कामे अंतर्भूत होती. परंतु, पपिंग मशिनरी कार्यान्वित होऊन पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्याचे आयुष्यमान संपले आहे. त्यामुळे स्काडा व ॲटोमेशनचे कामे करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या यांत्रिकी विभागाने कळवले आहे. या कामाचे दोन कोटी १८ लाख रुपये शिल्लक राहणार असून, यातून एक कोटी ८८ लाखांचे धनेगाव येथे हेडवर्क्स ७५० एचपी पंपसेट, ट्रान्सफॉर्मर, हरंगूळ येथे ४४२ एचपी पंपसेट, ट्रान्स्फॉर्मर आदी कामे करणे गरजेचे आहे. याचाही प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. शासनाने या प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली तर पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहेत.
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Above Ten Crores Proposed In Red Tap, Latur Municipal Corporation Pay Attention