खेळण्या बागडण्याच्या वयातच अंगमोड मेहनत : काय होत आहे परिणाम, ते वाचा

प्रमोद चौधरी
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

विविध योजनांवर लाखो रुपयांची उधळण होत असताना हॉटेलमध्ये काम करणारी, रस्त्यावर फिरून बुटपॉलिश करणारी, गंबंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास शासनाला अद्यापही यश आलेले नाही.

नांदेड : सद्यस्थितीत समाजातील दुर्बल, निराधार, गोरगरिबांच्या मुलांना उपेक्षितांचे जिणे जगावे लागत आहे. खेळण्या-बागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयातच अंगमोड मेहनत करून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे.

समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने रोजगार मिळवून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो; मात्र शिक्षण घेण्याच्या वयात जर लहान बालकांवर आपल्या घराचा आर्थिक गाडा ओढण्याची जबाबदारी येऊन ठेपली, तर अशा बालकांचे जीवन संपल्यागत होते. एकीकडे शासन शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. दुसरीकडे घरी पैसे दिले नाहीत. तर एकवेळच्या जेवणालाही मुकणाऱ्या चिमुरड्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शाळा आणि शिक्षणापासून अशी असंख्य मुले कोसोदूर जात असल्याची विदारक परिस्थिती आहे.

हे वाचा - अशोक चव्हाण कोणाला म्हणाले... मेरे सपनो की रानी कब आयेगी तू.....

असा होतो मुलांचा उपयोग
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अशा मुलांचा काहीजण फायदा घेत आहे. कमी मोबदल्यात या मुलांना दिवसभर राबवून घेतले जाते. हद्द म्हणजे अशा मुलांचा भिक मागण्यासाठी उपयोग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे. शासकीय यंत्रणा मात्र कागदावरच रेघोट्या ओढून खेळत आहे. त्यांच्या दृष्टीस हा प्रकार का दिसून येत नाही? हा संशोधनाचाच विषय आहे. हॉटेल, किराणा, कापड दुकान, हार्डवेअर, भंगार, वीटभट्टी अशा विविध ठिकाणी बालकामगार अंगमेहनतीची कामे करताना दिसून येत आहेत. १६ वर्षांच्या आतील लहान मुलांना कामावर ठेवले तर शंभर रुपयांनी मजुरी कमी होते. १६ वर्षांवरील कामगारांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरीचा सध्याचा दर आहे.

हे तुम्ही वाचाच - बायकोच्या रागीटपणापासून अशी मिळवा सुटका...
 
चुकीची कार्यपद्धती कारणीभूत
अठराविश्‍वे दारिद्र्यातील अशा लहान मुलांच्या पालकांनाही आपला मुलगा इतक्या कमी वयात २० रुपये कमावून आणतो, याची उत्सुकता असते; मात्र अशा परिस्थितीत त्या चिमुकल्यांना शिक्षणापासून मुकावे लागते, याकडे लक्ष पुरविण्यास शासनासह राजकीय नेत्यांनाही वेळ नाही. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून झटपट कुटुंब सर्वेक्षण मोहीम, महात्मा फुले हमी केंद्र मोहीम राबविण्यात येते. वस्तीशाळांची निर्मितीही केली. याशिवाय मुलांच्या शिक्षणाकडे कल वाढण्यासाठी मोफत प्रवास योजना राबविली जात आहे. शासनाचे हे उपक्रम चुकीच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावी झालेले नाहीत.

हे तुम्ही वाचलेच पाहिजे  - ‘ते’ ३५ वर्षांनी भेटले आणि वाचा त्यांनी काय केले

पालकांना हक्काचा रोजगार मिळावा
बालमजुरी वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे सर्वच ठिकाणी रोजगाराचा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. पिढ्यान पिढ्या कुटुंबप्रमुखांची मिळकत तोकड्या स्वरूपात असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांचे पालनपोषण करणे कठीण होत असल्याने लहान मुलांनाही नाइलाजास्तव शिक्षणाकडे दुर्लक्ष करून बालवयातच रोजगाराच्या शोधात बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे त्यांची येणारी पिढीही त्याच मार्गावर आपले पाऊल ठेवत असल्याचे चित्र आहे. बालमजुरांना शिक्षणाच्या प्रवाहात खरोखरच आणावयाचे असेल, तर सर्वप्रथम त्यांच्या पालकांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याची आपश्‍यकता आहे.

हे देखील बघा -  Video And Photos : लेकीचे लग्न भारतीय संविधानाला समर्पित - कसे ते वाचायलाच पाहिजे

शासन पडते आहे कमी
रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि राजकीय नेते कमी पडत असल्याने बालमजुरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याशिवाय बालमजुरीचे प्रमाण कमी होणे नाही, हे सत्य आहे.
- भालचंद्र देशपांडे (सामाजिक कार्यकर्ते)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the Age of Buying toys, Angamod Worked  Nanded News