साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दालनाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद

राजेंद्रकुमार जाधव
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

उस्मानाबाद : शहरात होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. 10) ग्रंथप्रदर्शनाच्या स्टॉलला हजारो वाचकांनी भेटी दिल्या. यामध्ये ग्रंथ खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी वाचकांचा व ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

उस्मानाबाद : शहरात होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. 10) ग्रंथप्रदर्शनाच्या स्टॉलला हजारो वाचकांनी भेटी दिल्या. यामध्ये ग्रंथ खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी वाचकांचा व ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून साहित्यिक चळवळ वाढीला लागल्याने वाचन संस्कृतीतही वाढ होत आहे. यापूर्वी उस्मानाबादेत झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलन आणि मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनामुळे जिल्ह्यात साहित्यिक आणि वाचन चळवळ वाढीला लागल्याचे चित्र आहे. त्यातून पुस्तके खरेदी करून वाचनाची सवय लागत चालली आहे. वाचनाची ही भूक भागविण्यासाठी जिल्ह्यातील अनेकजण पुस्तक खरेदीला पसंती देत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहे.

वाचा - संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार

उस्मानाबादेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरवात झाली. या संमेलनानिमित्त ग्रंथ विक्रीचे जवळपास 250 स्टॉल लावण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारपासून या स्टॉलवर वाचक, ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक स्टॉलमध्ये पुस्तकांची पाहणी करीत आपल्या आवडीनुसार पुस्तकांची खरेदी ग्राहक करीत होते. 

हेही वाचा - Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके  

या स्टॉलमध्ये विविध प्रकारची लाखो पुस्तके उपलब्ध आहेत. आरोग्यविषयक, विविध प्रकारच्या रेसीपीच्या पुस्तकांना महिला व तरुणींकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र होते. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विविध नेत्यांची चरित्रे, कथा, कांदबऱ्या, ऐतिहासिक, कृषीविषयक पुस्तके स्टॉलवर उपलब्ध आहेत. 

ग्रंथप्रदर्शन, विक्रीला संमेलनाच्या पहिल्याच दिवशी वाचक आणि ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
- रोहन चंपारनेरकर, रोहन प्रकाशन, पुणे.

नामांकित लेखकांच्या कथा, कांदबऱ्यांना वाचक पसंती देत असल्याचे चित्र होते. स्पर्धा परीक्षेविषयी असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर तरुण, तरुणींची गर्दी होती. 50 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंतची पुस्तके अशा स्टॉलवर आहेत. त्यामुळे अशा पुस्तकांना तरुण, तरुणींची मागणी होती. राज्याच्या विविध शहरातील नामांकित प्रकाशनांनी या ठिकाणी स्टॉल लावले आहेत.

अरे बापरे - साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

बहुतांश प्रकाशकांनी या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी 20 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत ठेवली आहे. काही स्टॉलवर पाच पुस्तके चारशे रुपयांना दिली जात आहेत. या सवलतीमुळे ग्राहकांबरोबर पुस्तक विक्रेत्यांचाही फायदा होत आहे. स्टॉलमधील पुस्तकांची पाहणी करीत आपल्या आवडीचे पुस्तके खरेदी करण्यामध्ये दुपारपासून अनेक ग्राहक मग्न होते. 

संमेलनात पहिल्याच दिवशी ग्रंथ विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरोग्यविषयक पुस्तके, कथा, कादंबऱ्या खरेदीकडे वाचकांचा कल आहे. 
- डी. डी. सोनार, साकेत प्रकाशन, औरंगाबाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News