साहित्यनिर्मिती हीच साहित्यिकांची जात : महानोर

आशिष तागडे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

एखाद्याला मत मांडू न देणे योग्य नाही. तुम्हाला त्याचं मत पटत नसेल तर तोडीस तोड उत्तर द्या, मात्र, त्यासाठी जातीभेदाचे कप्पे करू नका.

संत गोरोबाकाका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : "परिवर्तनाच्या काळात साहित्यिकाची जात नसते. उच्च साहित्यनिर्मिती हीच साहित्यिकांची खरी ओळख असून माणुसकी हाच धर्म आहे," असे स्पष्ट प्रतिपादन ना. धों. महानोर यांनी आज केले.

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात महानोर बोलत होते. साहित्य संमेलन आणि वाद यावर महानोर यांनी स्पष्ट शब्दात ताशेरे ओढले. तुमच्यासमोर उभा आहे तो मीच आहे. दुसरा कोणी नाही किंवा माझे भूत नाही, असे स्पष्ट करत महानोर म्हणाले, माणुसकी हाच मोठा धर्म आहे. परिवर्तन होत असताना, ख्रिश्चन अध्यक्ष कसा झाला हा प्रश्नच कसा उभा राहतो? मराठीमध्ये आत्मचरित्रे देण्याचे बीज लक्ष्मीबाई टिळक यांनी घालून दिले आहे. रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई यांनी बालकवी यांच्यावर भरभरून प्रेम केले. त्यांना कविता लिहिण्यासाठी उद्युक्त केले. हा ऋणानुबंध जोडणारा आजच्या संमेलनत मोठा धागा आहे. साहित्यातून जात, धर्म, पंथ बाजूला काढले पाहिजेत, अशी अपेक्षा महानोर यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

साहित्य आणि राजकारणी त्याविषयी बोलताना ते म्हणाले, ''साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती नको अशी आपली भूमिका असते, पण आपण राजकीय व्यासपीठावर जातोच ना?'' याबाबत यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, ''साहित्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे ते राजकीय व्यक्तीमत्त्व होते. याबाबत त्यांनी साहित्यिक आणि राजकीय व्यक्ती म्हणून पण ठाम भूमिका वेळोवेळी व्यक्त केली आहे.''

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

देशात झालेल्या सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत यांच्या हत्येबाबत अत्यंत तीव्र शब्दात महानोर यांनी नाराजी व्यक्त केली. हत्या करणाऱ्यांना शोधण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणणे करंटेपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात त्यांनी फटकारले. एखाद्याला मत मांडू न देणे योग्य नाही. तुम्हाला त्याचं मत पटत नसेल तर तोडीस तोड उत्तर द्या, मात्र, त्यासाठी जातीभेदाचे कप्पे करू नका.
ते म्हणाले, ''मराठवाडा ही कलेची, साहित्यिकांची भूमी आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी दिल्यास हा भाग प्रगती करेल.''

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News