मराठी साहित्याचा शापित इतिहास : ऋषिकेश कांबळे

सुशांत सांगवे
शनिवार, 11 जानेवारी 2020

अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनजाणीवा' या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता.

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : अण्णा भाऊ साठे यांनी उपेक्षितांचे, वंचितांचे जगणे उत्तम, उत्कटपणे आपल्या साहित्यातून मांडले. जगविख्यात लेखकाने लिहावे, असे हे लेखन आहे. तरी त्यांची दखल इथल्या साहित्यिकांनी, समीक्षकांनी घेतली नाही. त्यामुळे मराठी साहित्याचा लिहिला गेलेला इतिहास हा शापित इतिहास आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी शनिवारी टीका केली.

अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनजाणीवा' या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे, मोतीराम कटारे, डॉ. ईश्वर नंदापुरे, शाहू पाटोळे, डॉ. वृंदा कौजलगीकर हे अभ्यासक सहभागी झाले होते.

कांबळे म्हणाले, उपेक्षितांचे, वंचितांचे दुखणे, त्यांचे जगणे, त्यांची भूक, त्यांच्या वेदना, त्यांचे शोषण अण्णा भाऊंनी शाहिरीतून मांडली. कथेतूनही कामगारांचे जगणे मांडले. पोटाला-भुकेला जात-धर्म नसतो, हे सूत्र घेऊन ते लिहीत राहिले. हा या जातीचा, तो या जातीचा असे लिहिले नाही. वास्तवावर बोट ठेवले. पाटोळे म्हणाले, अण्णा भाऊ यांचे साहित्यिक वैश्विक आहे. ते कुठल्या कप्प्यात आपल्याला बसवता येणार नाही. जातीबाबतचा अभिनिवेष त्यांनी कुठेही मांडला नाही.

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

नंदापुरे म्हणाले, दुःख टिपत असताना जग सुंदर करायचे आहे, ही भूमिका घेऊन लेखक लिहितात. तीच भूमिका अण्णा भाऊ यांच्या साहित्यात आहे. शोषणाला जात नसते. जिथे शोषण आहे, तिथे ते व्यक्त झाले आहेत. ते मानवतावादी होते. कवठेकर म्हणाले, अण्णा भाऊंची उपेक्षा झाली का नाही, यापेक्षा आजही त्यांची दखल घ्यावी वाटते, त्यांच्यावर लिहावे वाटते, हे अधिक महत्त्वाचे आहे. माणुसकीवरील ठाम विश्वास, परिवर्तनशील माणूस, माणसापेक्षा समाज मोठा, माणसाचे स्वातंत्र्य या जाणिवांचे चित्रण त्यांच्या साहित्यात दिसते. या दृष्टीने त्यांचे साहित्य समजून घेतले गेले नाही.

Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके  

कटारे यांनी वर्ण जाणिवा, कौजलगीकर यांनी स्त्री-जाणिवा यावर प्रकाशझोत टाकला. प्रशांत चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता गुंजाळ यांनी आभार मानले.

जात लेखकांच्या मनातही

जात नसते असे म्हंटले जाते. पण हे उभं सत्य आहे की समाजातच नव्हे लेखकांच्या मनातही जातींचा सुप्त डोह असतो. त्यात ते तरंगत असतात. हे उघड सत्य आहे. जात ही बॉम्बपेक्षाही फार भयानक बाब आहे, असे कांबळे यांनी सांगितले. हाच धागा पुढे नेत नंदापुरे म्हणाले, धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असते त्यावेळी अशांतता पसरते. सध्या समाजात हेच चित्र पहायला मिळत आहे.

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News