माझ्या बापाने नाही केला पेरा, तर तुम्ही काय खासाल का धतुरा? 

उत्कर्षा पाटील
शनिवार, 11 जानेवारी 2020

कवीचे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाने जपायला हवे. आज आपण काय करायचे, काय खायचे, कोणते कपडे घालायचे, काय लिहायचे, कोणत्या विचारधारेच्या बाजूने उभे राहायचे, हे सर्व अदृश्‍य शक्ती ठरवते आहे.

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : "धर्म हा समानतेच्या पाठीवरचा आसूड', "मेलं नाही अजून आभाळ, बापा आताच आशा सोडू नको', "सांगा माझ्या बापाने नाही केला पेरा, तर तुम्ही काय खासाल का धतुरा', "हुकूमशाला सलाम' असा वास्तववादी हुंकार 93 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवितेतून पाहायला मिळाला. 

लेखकांवर आलेली बंधने, झुंडशाही, पर्यावरणाचा ऱ्हास, शहरीकरण, स्त्री जाणीव, स्त्री भ्रूणहत्या, स्त्रियांची असुरक्षितता, शेतकऱ्याच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे मनोबल वाढवणारे असे विषय कवितांतून मांडण्यात आले. या कवी संमेलनाचे अध्यक्षपद कवयित्री नीरजा यांनी भूषवले. 

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

आज आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलले आहे. जगण्याचे प्रश्न कठीण झाले आहेत. पण जगण्याचा प्रश्नांकडे न पाहता एका वेगळ्या उन्मादात जगायला लावणारा जमाव, झुंड आपल्याभोवती पाहायला मिळते आहे. या कठीण काळाला सर्जनशील लेखकाला सामोरे जावे लागते, असे नीरजा म्हणाल्या. 

ज्यावेळी सर्जनशील कवी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलतो, तेव्हा कवीचे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाने जपायला हवे. आज आपण काय करायचे, काय खायचे, कोणते कपडे घालायचे, काय लिहायचे, कोणत्या विचारधारेच्या बाजूने उभे राहायचे, हे सर्व अदृश्‍य शक्ती ठरवते आहे. तुम्ही काहीही बोलले तरी लोक तुमच्यावर झुंडीने चालून येतात, असे वास्तव त्यांनी परखडपणे मांडले. 

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

या कवी संमेलनात इंद्रजित भालेराव, मंगेश विश्वासराव, आनंद पेंढारकर, सायमन मार्टिन, संदीप जगदाळे, नेहा भंडारकर, संजय वरकड, उद्धव कानडे, अशोक बागवे, देविदास फुलारी, बालाजी इंगळे, प्रमोद माने, रवींद्र लाखे, सुरेश कुलकर्णी, प्रकाश खरात, संजय चौधरी, संजीवनी तडेगावकर, रमेश पवार, विलास हडवळे, मारुती कटकधोंड, राजकुमार धुरगुडे पाटील, विनय दांदळे, अनंत नांदूरकर, भूषण रामटेके, देवेंद्र, तातोडे, शोभा रोकडे, शकुंतला सोनार, सुधीर बापट, मेघराज मेश्राम, मुबारक शेख, सुरेश नाईक, सुरेश वर्धे, रसिका देशभुख आदी कवींचा समावेश होता. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. केशव खटिंग यांनी केले. 

 Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News