रस्ता ओलांडतांना ट्रकची धडक, चिमुरडीचा मृत्यू

प्रशांत बर्दापुरकर 
Thursday, 1 October 2020

बर्दापूर फाटा परिसरात अंबाजोगाई-लातूर महामार्ग ओलांडत असताना तिला ट्रकची (एमएच १६ एई ७५९९) धडक बसली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला.

अंबाजोगाई (जि. बीड) : ट्रकची धडक बसल्याने चिमुरडी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. एक) दुपारी तालुक्यातील बर्दापूर फाटा येथे घडली. निकिता अनिल राठोड (वय सहा, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे मृताचे नाव आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गुरुवारी दुपारी निकिता ही बर्दापूर फाटा परिसरात अंबाजोगाई-लातूर महामार्ग ओलांडत असताना तिला ट्रकची (एमएच १६ एई ७५९९) धडक बसली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. बर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुतण्याच्या हल्ल्यात जखमी काकाचा मृत्यू 
बीड : क्षुल्लक कारणावरून पुतण्याने सुरीने वार केल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. एक) मृत्यू झाला. पुतण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (ता. २८) घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी खुनाचे कलम वाढविण्यात आले. शरीफ अब्दुल गणी कुरेशी (वय ५५, रा. पिंपळनेर ता. बीड) असे मृताचे नाव असून, फारुक रमजान कुरेशी असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंगळवारी दुपारी शरीफ अब्दुल गणी कुरेशी गावातील एका हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी त्यांचा पुतण्या फारूक रमजान कुरेशी याने त्यांना ‘तू माझ्या बाबतीत मुन्ना व माऊली इथापे यांना काय सांगितले’ अशी कुरापत काढत हातातील सुरीने शरीफ यांच्या पोटात दोन व डाव्या पायावर एक वार केला. जखमी शरीफ यांच्या जवाबावरून फारुक कुरेशीविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता.

दरम्यान, गुरुवारी बीड येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान शरीफ यांचा मृत्यू झाला. शरीफ यांच्या जबाबावरून गुन्हा नोंद होताच पोलिसांनी फारुक कुरेशी यास जेरबंद केले होते. त्यास बुधवारी (ता. ३०) न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आता यात खुनाचे कलम वाढविण्यात आले असून, तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambajogai Accident News child death