बापरे! इतक्या थंड रक्ताने त्यांनी अमोलचा खून केला, की नंतर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

  • अमोल घुगे खून प्रकरण 
  • मुख्य संशयितासह दोघांना बेड्या 

औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला.

गाजलेल्या चित्रा डकरे खूनातील संशयित अमोल घुगेचा अशा पद्धतीने मारेकऱ्यांनी काटा काढला. यातील मुख्य संशयितासह दोघांना औरंगाबादेतील सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी (ता. 15) करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सौरभ नाना वानखेडे (वय 22, रा. त्रिवेणीनपगर, सिडको एन-सात) व रितेश उर्फ विक्की भगवान पूसे (वय 22 रा. अयोध्यानगर सिडको एन-सात) अशी संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

सौरव व रितेशने 31 डिसेंबर 2019 ला अर्थात थर्टीफस्टच्या रात्री घरातून अमोल घुगे याला बोलाविले. त्याला शिवनेरी कॉलनीत नेले. तेथे सौरभ व रितेशचे सहकारी गौरव नाना वानखेडे व शुभम विसपूते यांना हाताशी घेत संशयितांनी अमोलला जून्या वादातून मारहाण केली. यानंतर त्याच्या पोटात वार करुन खून करण्यात आला.

यानंतर त्याला सौरभच्या दुचाकीवरुन अमोलचा मृतदेह अयोध्यानगर भागातील गार्डनच्या भिंतीलगतच्या नाल्याजवळील ढाप्यात टाकण्यात आला. यानंतर दुचाकीच्या टाकीमधून पेट्रोल काढून मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी करून तेथून पळ काढला होता. या प्रकरणात गौरव व शुभम यांना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या हर्सूल कारागृहात आहेत.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

सिडको पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत संशयित सौरभ व रितशेचे लोकेशन व इतर माहिती घेत त्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार राजेश बनकर, दिनेश बन, सुभाष शेवाळे, संतोष मुदीराज, लाला पठाण, विशाल सोनवणे, किशोर गाढे, इरफान खान यांनी केली. तपास रतन आर. डोईफोडे करीत आहेत. 

अटकेच्या भितीने सोडले होते शहर 

संशयित सौरभ व रितेश यांनी खूनानंतर पोलिस पकडू नये म्हणून शहरातून काढता पाय घेतला होता. पण पोलिस त्यांच्या मागावरच होते. ते रेल्वेने शहरात येणार असून मुकुंदवाडी स्थानकात उतरणार असल्याचे समजताच सिडको पोलिसांनी सापळा रचला व त्यांना मुकुंदवाडी स्थानकातून त्यांना अटक केली. 

रविवारपर्यंत पोलिस कोठडी

आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे जप्त करणे बाकी आहे. आरोपींचे मृताशी यापूर्वी कोणत्या कारणावरुन व कोठे भांडण झाले होते याचा तपास करणे आहे. त्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहरकर यांनी आरोपींना रविवारपर्यंत (ता.19) पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Ghuge Murder Case Solved Aurangabad Crime News Breaking News