esakal | Coronavirus| आष्टीतील लसीकरण केंद्रेच बनलेत ‘सुपर स्प्रेडर’
sakal

बोलून बातमी शोधा

Ashti corona

Coronavirus| आष्टीतील लसीकरण केंद्रेच बनलेत ‘सुपर स्प्रेडर’

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड): कोरोनाच्या वाढत्या (covid 19) उपद्रवापासून वाचण्यासाठी सध्या लसीकरणाला (corona vaccination) प्रत्येकजण प्राधान्य देत असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळत आहे. परंतु या गर्दीमुळे व तेथील वातावरणामुळे कोरोना साथरोग पसरण्याचाच धोका अधिक वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात शासनाने जारी केलेली नियमावली नावालाच असून, सोशल डिस्टन्सिंगसह (social distance) सर्वच नियमांचा फज्जा उडत असल्याने आरोग्य केंद्रांच्या परिसरातील वातावरणच ‘सुपर स्प्रेडर’ ठरण्याचा धोका वाढला आहे.

कोरोना साथरोगाच्या दुसर्‍या लाटेने या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सध्या लसीकरण करण्याकडे प्रत्येकाचा कल दिसत आहे. आष्टी तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख चढताच राहिला असून, अनेकजणांचे बळीही गेले आहेत. सर्वच ठिकाणी असलेल्या या स्थितीमुळे लसीकरणासाठी गर्दी उसळत आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालय परिसरातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये लसीकरण करण्यात येते. याशिवाय तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: Beed Lockdown: बीड जिल्ह्यात कडक लॉकडाउन जाहीर

दरम्यान, आरोग्य केंद्र परिसरातील गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळले जाताना दिसत नाही. गर्दीतील कोणी कोरोनाबाधित आहे किंवा नाही, हे तपासण्याची यंत्रणा नाही. शिवाय कोरोना चाचणीसाठी आलेले नागरिक, इतर आरोग्य तपासण्या, लसीकरणाचे फॉर्म भरणे, मेडिकलमधून औषधे खरेदी आदी कामे करताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. परिणामी हे वातावरण ‘सुपर स्प्रेडर’ ठरण्याचा धोका अधिक आहे. सर्वच ठिकाणी अशी स्थिती असल्याने प्रशासनाने आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र परिसरात होणार्‍या गर्दीचे नियंत्रण करून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

ग्रामीण रुग्णालयातील गर्दीत भर

आरोग्य केंद्र परिसर कोविड रुग्णांच्या उपचारामुळे नेहमीच गर्दीने फुलून गेलेला राहतो. रुग्णांचे नातेवाईक, तपासणीसाठी आलेले नागरिक, मदतीसाठी येणारे सामाजिक कार्यकर्ते, डबा ने-आण करणारे कुटुंबीय, आरोग्य अधिकारी-कर्मचारी, तसेच रुग्णांना सोयीसुविधा पुरवणारे इतर घटक यामुळे परिसरात आधीच वर्दळ असते. आता या गर्दीत लसीकरणाच्या गर्दीची भर पडली आहे. हे वातावरण ‘सुपर स्प्रेडर’ ठरण्याचा धोका वाढला आहे.

हेही वाचा: सिल्लोडमध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा! उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ

लसीकरणाची केंद्रे-

  • आष्टी ट्रॉमा केअर युनिट

  • कडा प्राथमिक आरोग्य केंद्र

  • टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्र

  • धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र

  • खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्र

  • सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्र

अ‍ॅण्टीजेन चाचण्या बंद

यापूर्वी लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांची अ‍ॅण्टीजेन चाचणी झाल्यानंतरच लसीकरण होत होते. परंतु, अ‍ॅण्टीजेन किटच्या कमतरतेमुळे या पद्धतीने सर्वांची चाचणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे गर्दीतील एखादा ‘सुपर स्प्रेडर’ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत बालकांसाठी होणार शंभर बेडचे कोविड रुग्णालय

आष्टीतील ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारील भगवान महाविद्यालयात लसीकरण करण्यात येत आहे. येथे मोठे मैदान असल्याने गर्दी झाली तरी रांगा लांबवर लावण्यात येतात. यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात असून लसीकरणासाठी येणारांना नियम बंधनकारक आहेत. प्रशासन व आरोग्य यंत्रणा सर्व ती खबरदारी घेत आहेच मात्र नागरिकांनीही नियम पाळून आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ नये यादृष्टीने सहकार्य करावे.

(डॉ. राहुल टेकाडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आष्टी)