कोविड सेंटरमध्ये 'विठ्ठल नामाचा गजर', हभप डॉक्टरांची किर्तनसेवा !

अनिरुद्ध धर्माधिकारी 
Thursday, 10 September 2020

आष्टीत कोरोना रुग्णांना धीर देण्यासाठी उपक्रम

आष्टी (बीड) : कोरोनाच्या उपचारासाठी आष्टी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी हरिभक्त परायण डॉक्टरच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाग्रस्तांची भीती दूर होऊन मानसिक आधार देण्यासाठी हा अभिनव उपक्रम आष्टी येथे राबविण्यात आला. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये विठ्ठल नामाचा गजर निनादला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आष्टी शहरासह तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाग्रस्तांबरोबर इतरांनाही धास्ती बसली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी आष्टी येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सध्या ६७ रुग्ण उपचार घेत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण प्रचंड घाबरून जातो. वृद्ध, महिला यांना याचा जास्त धक्का बसतो, असा अनुभव आहे. रुग्णांवर उपचार व्हावेत म्हणून आरोग्य व प्रशासन व्यवस्था सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. याच दृष्टिकोनातून रुग्णांना मानसिक आधार मिळून आनंदी वातावरण मिळावे, या उद्देशाने या केंद्रांत नुकताच किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हभप डॉ. अमीत डोके हे आष्टी येथील रहिवासी असून खासगी प्रॅक्टिस करतात. सध्या त्यांच्याकडे आष्टी येथील आयटीआयमध्ये असलेल्या कोवीड उपचार केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. अमीत डोके महाराजांचे सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून सुमारे दीड तास कीर्तन झाले. अध्यात्मिक संदेश देतानाच कोरोनारुग्णांना विनोदी शैलीत कीर्तन करून त्यांनी मानसिक आधार दिला. सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळत झालेल्या या कीर्तनाच्या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष कोटुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मोरे, डॉ. अनिल आरबे, आरोग्य सहाय्यक शंकर वाळके, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नागेश कारंडे, मोबीन सय्यद, अशोक गळगटे, रवी माने आदींसह कोरोनाग्रस्त रुग्ण उपस्थित होते.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashti Kovid Center Kirtan ceremony