esakal | पुलावरुन जाताना जीव धोक्यात : हातानेच मुरूम टाकून करावी लागते वाट !
sakal

बोलून बातमी शोधा

बीड रस्ता.jpg

ग्रामस्थांचे हाल; डोईठाण ते महिंदा रत्यासह पुलाचे कामही रखडले.

पुलावरुन जाताना जीव धोक्यात : हातानेच मुरूम टाकून करावी लागते वाट !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आष्टी (बीड) : तालुक्यातील डोईठाण ते महिंदा रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले असून मजबूतीकरणही पावसामुळे ठिकठिकाणी उखडले आहे. रस्त्यावर सुरुडी येथील पुलावर दोन महिन्यांपूर्वी टाकलेला मुरूम पावसाने वाहून गेला असून शेतकरी व ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

डोईठाण ते मोराळा अंतर १३ किलोमीटर आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर या भागातील सुरुडी, नागतळा, महिंदा, वनवेवाडी, मोराळा, नागझरी तांडा, पांगरा या गावांतील ग्रामस्थांमधून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, भूमीपूजन होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रस्त्याचे सुरुडी ते नागतळा एवढे पाच किलोमीटर अंतराचेच डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मजबुतीकरण करून ठेवण्यात आले आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसाने व डांबरीकरण लवकर न झाल्याने मजबुतीकरणाच्या झालेल्या कामातील खडी व मुरूम वाहून जावून तसेच पाणी साचून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याच्या कडेने पुन्हा खडी आणून टाकण्यात आली असून काम रखडलेल्या अवस्थेत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन महिन्यांपूर्वी सुरुडी गावानजीक असलेल्या पुलावर नळ्या अंथरण्यात आल्या असून त्यावर मुरूम आणून टाकण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी या भागात झालेल्या जोरदार पावसाने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पुलावरील मुरून वाहून गेला.  ग्रामस्थांना ये-जा करणे अवघड झाले आहे. बैलगाडी अथवा चारचाकी वाहनांना जाण्या येण्यासाठी पुलावर हातानेच मुरूम टाकून कशीबशी वाट काढून घ्यावी लागत आहे. याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही काम पूर्ण होत नसल्याने संताप व्यक्त होत असून तातडीने काम मार्गी न लागल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

शेतक-यांसह विद्याथ्यांना त्रास
खरीप हंगाम संपत आला असून रब्बीच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. यासाठी बी-बियाणे, कर्जप्रकरणांसाठी शेतकर्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. तसेच विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक कागदपत्रे व शाळा-महाविद्यालयांत जाण्यायेण्यासाठी हा रस्ता महत्वाचा असून, पुलासह रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मोठ्या हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)