धक्कादायक! पेट्रोल टाकून आईला जाळण्याचा प्रयत्न; दोन्ही मुलांना अटक !  

रामदास साबळे 
Sunday, 4 October 2020

पोलीस प्रशासनात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या पतीच्या निधनानंतर मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची मागणी करून ते देण्यास नकार देणाऱ्या मुलांकडून पन्नास वर्षीय सावत्र आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. 

केज (बीड) : पोलीस प्रशासनात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या पतीच्या निधनानंतर मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची मागणी करून ते देण्यास नकार देणाऱ्या मुलांकडून पन्नास वर्षीय सावत्र आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (ता.०३) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कानडीमाळी येथे घडली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या प्रकरणी सदरील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोघा जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच दोघांना पोलीसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तालुक्यातील कानडीमाळी येथील इंदुबाई लालासाहेब कुचेकर (वय-५०) यांचे पती हे पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत होते. ते परळी पोलीस ठाण्यात शिपाई सेवेत असताना सन-२००५ साली अचानक बेपत्ता झाले. याबाबत पोलीसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. बराच शोध घेऊन ते मिळून न आल्याने त्यांचा सन-२०१३ साली मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले. त्यामुळे पतीच्या नोकरीच्या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीचे (पी.एफ.) तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार रूपये मला सन-२०१८ च्या ऑगस्ट महिण्यात मिळाले. त्यापैकी नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार रूपये मी मुलगा संतोष लालासाहेब कुचेकर व नितीन लालासाहेब कुचेकर यांना बोलावून घवून पैसे दिले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र त्यानंतरही त्यांनी आम्हाला आणखीन पैसे दे म्हणून माझ्या घरी येऊन सतत मला शिवीगाळ व मारहाण करत असत; परंतू ती माझीच मुलं असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या मी व माझा मुलगा धीरज कानडीमाळी येथे पतीच्या पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करून राहत आहोत. तर संतोष व नितीन हे बीड शहरात वास्तव्यास आहेत. अशातच अचानक शनिवारी (ता.०३) सायंकाळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संतोष व नितीन माझ्या घरी आले. यावेळी नितीन  म्हणाला, आमचे पैसे देण्याची व्यवस्था कर. नाही तर तुझा खुन करीन ! यापुर्वीही मारहाण केल्याने घाबरून जाऊन गावातील माणसे  गोळा करून त्यांच्या समक्ष पैसे म्हणत बाहेर निघून आले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी घरी असताना माझी दोन मुले संतोष व नितीन माझ्या घरी येऊन भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची मागणी केली. तेव्हा मी त्यांना माझ्याकडे आता पैसे नाहीत असे म्हणत घरातून बाहेर पडून रस्त्यावर आले. त्यावेळी संतोषच्या हातात पेट्रोलची बॉटली होती. नितीनने  हिच्या अंगावर पेट्रोल टाक म्हणताच. मी माझी भावजय रमलबाई कान्हु खाडे यांच्या घराकडे पळाले. माझा पाठलाग करून शिवाजी रघुनाथ राऊत यांच्या पाण्याच्या जारच्या दुकानासमोर रस्त्यात गाठून संतोषने हातातील बॉटलमधील पेट्रोल माझ्या अंगावर टाकले तर नितीनने मला जीवे मारण्याच्या उद्देशाने काडी पेटीतील काडी पेटवून माझ्या अंगावर फेकणार तेवढ्यात गावचे सरपंचांनी नितीनच्या हातावर मारून पेटलेली काडी विझवली. 

त्यावेळी जमा झालेल्या ग्रामस्थांनी त्या दोघांना पकडल्याचे पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी इंदुबाई कुचेकर यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून संतोष कुचेकर व नितिन कुचेकर यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to burn by throwing petrol on the body Beed Crime news