सुरक्षित वॉर्ड शोधू कुठे? आरक्षण सोडतीपूर्वीच इच्छुकांची फिल्डिंग 

माधव इतबारे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

महापालिका निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असून, मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल. तोपर्यंतचा वेळ संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. दोन-तीन दिवसांत वॉर्डरचनेबाबत राज्य निवडणूक आयोगाचे पत्र महापालिकेला मिळू शकते

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुका आता वॉर्ड पद्धतीनेच होणार हे निश्‍चित झाले आहे. वॉर्डरचना तयार झाल्यानंतर आरक्षण सोडत कधी निघणार याची विद्यमान नगरसेवक व इच्छुक प्रतीक्षा करीत आहेत. जुन्या आरक्षणाचा अभ्यास करून आपल्याला अपेक्षित आरक्षण नेमके कोणत्या वॉर्डात निघेल, याचे अंदाज सध्या बांधले जात आहेत. त्यानुसार फिल्डिंग लावण्याचे कामही अनेकांनी सुरू केले आहे. 

महापालिकेची आगामी एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असून, प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने पूर्ण केली होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर निवडणूक पद्धतीत बदल झाला आहे.

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने जुन्या म्हणजेच वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात यासंदर्भात निर्णय झाला. त्यामुळे वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका होणार, हे आता स्पष्ट झाले आहे, तर महापालिका प्रशासनाने प्रभाग पद्धतीसाठी केलेल्या तयारीवर पाणी फेरले गेले आहे.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

जुन्या वेळापत्रकानुसार 20 डिसेंबरला प्रभागरचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, शासनाने या प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे आता वॉर्डरचना तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, विद्यमान नगरसेवक व इच्छुक फिल्डिंग लावण्यात मग्न आहेत. आतापर्यंतच्या आरक्षणाचा अभ्यास करून कोणत्या वॉर्डाला कोणते आरक्षण लागू होऊ शकते, याचे अंदाज बांधले जात आहेत. "या' किंवा "त्या' वॉर्डात आपल्याला फायदा होईल, याचा अंदाज घेतला जात असल्याचे चित्र आहे.

वॉर्डांच्या रचनेत होणार बदल

प्रभागरचना रद्द करण्यात आली असली तरी वॉर्डरचनादेखील नव्याने होणार आहे. एका वॉर्डाची लोकसंख्या निश्‍चित झाल्यानंतर शहराची लोकसंख्या 115 वॉर्डांत विभागून रचना तयार केली जाईल. सातारा-देवळाई भागात पूर्वी दोनच वॉर्ड होते, तर या भागाची लोकसंख्या तब्बल 50 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सातारा-देवळाई भागाला लागून असलेल्या वॉर्डांच्या सीमा बदलल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.

निवडणूक वेळेतच होणार

प्रभागरचना रद्द झाल्यानंतर आता वॉर्डरचना तयार करणे, आरक्षण सोडत, त्यावर हरकती, आक्षेप व सुनावणी या प्रक्रियेत मोठा वेळ जाईल. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडतील, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मात्र, महापालिका निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असून, मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल. तोपर्यंतचा वेळ संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. दोन-तीन दिवसांत वॉर्डरचनेबाबत राज्य निवडणूक आयोगाचे पत्र महापालिकेला मिळू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

असे आहे आरक्षण

अनुसूचित जाती प्रवर्ग 22
नागरिकांचा मागास प्रवर्ग 31
महिलांसाठी आरक्षित 57
अनुसूचित जमाती प्रवर्ग 1
एकूण 115

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Elections Marathi News