जगाच्या सुखाची बडबड करण्यासाठी हवे अध्यक्षपद : राजन खान

संकेत कुलकर्णी
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

साहित्य संमेलनाची निवडणूक जिंकणारच! 

'मी बडबड्या माणूस आहे. जगाच्या सुखाची बडबड करता यावी म्हणून मला ते व्यासपीठ महत्वाचे वाटते. राजकारण सगळीकडे असतेच. इथेही ते करावेच लागणार. पण अनेक पातळ्यांवर समाजात संवाद तुटत चालला आहे.

औरंगाबाद : 'मरण्याआधी मला समाज शांत, सुखी झालेला पहायचा आहे. त्यासाठी मी किमान बोलू शकतो. जगाच्या सुखाची बडबड करण्यासाठी मला अध्यक्षपद हवे आहे,'' अशी भूमिका ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी रविवारी (ता. पाच) मांडली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार असलेले खान पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मराठवाडा साहित्य परिषदेत राजन खान यांनी बडोदा येथे होत असलेल्या संमेलनासाठीच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका विशद केली. साहित्य संमेलनातील वादांबद्दल खुमासदार शैलीत बोलत ते म्हणाले, की या वादांतून समाजाला साहित्यावर चर्चेची संधी मिळते. एरव्ही दुर्लक्षित राहणाऱ्या या विषयाकडे लोक आकर्षित होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हे वाद कधी विकोपाला जात नाहीत. 

'मी बडबड्या माणूस आहे. जगाच्या सुखाची बडबड करता यावी म्हणून मला ते व्यासपीठ महत्वाचे वाटते. राजकारण सगळीकडे असतेच. इथेही ते करावेच लागणार. पण अनेक पातळ्यांवर समाजात संवाद तुटत चालला आहे. या विसंवादाशी दोन हात करता यावेत, लोकांची मने सांधता यावीत, यासाठी अध्यक्षपद मला हवे आहे,'' असे ते म्हणाले. 

शेतकरी, मजूर, शिक्षक, पत्रकार, संपादक, लेखक, प्रकाशक अशा अनेक भूमिका आयुष्यात बजावल्याचे सांगत श्री. खान यांनी 'अक्षर मानव' संस्थेच्या माध्यमातून तरुणांना साहित्य व्यवहाराशी आणि समाजाशी जोडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

पुरुषसत्ताक पद्धतीचा खेळ 
साहित्य संमेलन हा पुरुषसत्ताक पद्धतीचा खेळ होऊन बसला आहे. अनुराधा पाटील, अरुणा ढेरे, रेखा बैजल, प्रज्ञा पवार, यांच्यासारख्या कितीतरी श्रेष्ठ साहित्यिक महिला या संमेलनाच्या अध्यक्षपदी शोभतील. अनेक जणांना योग्यता असूनही समोर आणण्यात आपण कमी पडलो. विंदा करंदीकर, मंगेश पाडगांकर, विजय तेंडुलकर, बाबुराव बागुल, दया पवार, ना. धों. महानोर, रा. रं. बोराडे असे अनेक थोर साहित्यिकही अध्यक्षपदी बसू शकले नाहीत, अशी खंत राजन खान यांनी व्यक्त केली. पण ही निवडणूक प्रक्रिया किचकट असली, तरी महामंडळाच्या घटनेने ठरवून दिली आहे म्हटल्यावर स्वीकारली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. 

फेसबुकमुळे वाढला संवाद 
एकेकाळी अभिव्यक्तीला जागा नव्हत्या. फेसबुकसारख्या माध्यमांमुळे लोकांच्या व्यक्त होण्याला अचानक चांगले व्यासपीठ मिळाले. अगोदर लहानलहान चिठोऱ्यांवर लिहून आमच्या कित्येक वह्या भरल्या. आता फेसबुक पोस्टमुळे आपले म्हणणे चटकन लोकांपर्यंत पोहोचते. साहित्यप्रेमी तरुणांची मोठी फळी यामुळे जोडली गेल्याचे खान यांनी आवर्जून नमूद केले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: aurangabad news rajan khan marathi literary meet elections