Video : अंधारून येताच सरोवरावरून उडतात राक्षसी जीव 

file photo
file photo

औरंगाबाद -  ऐतिहासिक सलीम अली सरोवराकाठी वस्ती करुन राहणारे ते राक्षसी जीव दिवसा एखाद्या वेताळाप्रमाणे झाडाला लटकलेले असतात. सूर्यास्त होताच सर्वत्र अंधारात साम्राज्य पसरते आणि या अंधाराच्या साम्राज्यात या राक्षसी जीवांचा मुक्‍त संचार सुरू होतो. त्यांचे चित्कारण्याचे आवाज ऐकून अंगावर सर्रकन काट ये शहारुन उठते. 

गेल्या तीन-चार वर्षांत या राक्षसी जीवांची संख्या घटली आहे. तीन चार वर्षांपूर्वी ते साताठशेच्या संख्येने होते, मात्र आता यांची संख्या केवळ दोनशे ते अडीचशेवर आली आहे. यांना अशुभ मानले जात असले, तरी अशुभ नसलेले आणि पर्यावरण संवर्धनात मोठा हातभार लावणाऱ्या या उडणाऱ्या प्राण्यांना "जायंट बॅट' अर्थात "राक्षसी वटवाघूळ' नावाने ओळखले जाते. 

ऐतिहासिक सरोवराजवळ वस्ती 

मलिक अंबरच्या काळातील खिजर तालाब, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता, पक्षांची आश्रयस्थाने आहेत. प्रसिद्ध पक्षीमित्र सलीम अली यांचे या सरोवराला नाव देण्यात आल्याने आता हा तलाव "सलीम अली सरोवर' नावाने ओळखला जातो. हडको टी. व्ही. सेंटरकडे जाताना डाव्या बाजूला दिसणाऱ्या विशाल पिंपळवृक्षावर एक नजर टाकताच दिसतात ती जागोजागी दाटीवाटीने उलटी लटकलेली वटवाघळे. वटवाघळाच्या विविध प्रजातींपैकी इथे आढळणारे "जायंट बॅट' म्हणजे "राक्षसी वटवाघळे' उलटी लटकलेली पाहताच अंगावर काटा येतो. 

या पिंपळवृक्षाशिवाय महापालिकेच्या मलजल प्रक्रिया केंद्र - एसटीपीमागील शिसव, निलगिरीच्या झाडावरदेखील खूप मोठ्या प्रमाणात लटकलेली ही वटवाघळे बघून घाबरायला होते. "सृष्टीसंवर्धन'च्या माध्यमातून पक्षी, प्राण्यांसाठी करणारे व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणारे डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले, तीन-चार वर्षांपूर्वी या सरोवराच्या परिसरात हे जायंट बॅट 700 ते 800 होते, मात्र त्यांची संख्या आता फक्‍त 200 ते 250वर आली आहे. 

सैतानाचा दूत किंवा रक्‍त पिणारा ड्रॅक्‍युला म्हणणे चूक 

दिवसा निवांतपणे समूहाने झाडाला उलटे लटकून राहणाऱ्या व रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या निशाचरांना टीव्हीवरच्या विविध वाहिन्यांवरील हॉरर शो, हॉरर सिनेमा निर्मात्यांनी भितीदायक, अशुभ, सैतान अशी प्रतिमा चिकटवली आहे. याविषयी डॉ. पाठक म्हणाले, वटवाघळाच्या शरीराचे व पायाचे कातडे जोडलेले असल्याने त्याचा वापर ते पंखासारखा करतात आणि हवेत उडतात. त्यामुळे सर्वजण त्याला पक्षी समजतात. मात्र हा पक्षी नसून सस्तन प्राणी आहे. 

हवेत उडणारे कीटक तो वरचेवर खातो. त्याचे अन्न रात्रीच्यावेळी मिळत असते. म्हणून अन्नाच्या शोधात ते बाहेर पडत असतात. त्यांचे कोल्ह्यासारखे दिसणारे तोंड आणि उभे कान यामुळे त्याला फ्लाईंग फॉक्‍सदेखील म्हणतात. वटवाघुळ अशुभ नाही किंवा भितीदायक नाही त्याच्याविषयी खूप अंधश्रद्धा आहेत. पुर्वी वीज नव्हती त्यावेळी रात्री सर्वत्र मिट्ट काळोख असायचा. वटवाघुळ उडताना त्यांच्या पंखांचा आवाज व त्याचे चित्कारणे यामुळे ते भितीदायक वाटायचे यामुळे त्याला सैतानाचा दूत, ड्रॅक्‍युला, रक्‍त पिणारा अशी नामाभिदाने देण्यात आली, मात्र यापैकी तो काहीही नाही. त्याच्यापासून माणसांना कोणताही त्रास नसल्याचे स्पष्ट केले. 

वटवाघळे देतात संकेत 

औरंगाबाद शहरात सहा-सात प्रकारची वटवाघळे दिसतात. मुठीच्या आकाराची छोटी फलाहारी आणि मोठी फलाहारी म्हणजे मोठी फळे खाणारे. नागरी वस्तीत जास्त न आढळणारे मोठी फलाहारी वटवाघळे म्हणजे जायंट बॅट किंवा राक्षसी वटवाघूळ जे पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात आढळत; पण आता शहरात बदाम आणि आंब्याच्या झाडाशिवाय अन्य फळांची फारशी झाडे नसल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. या वटवाघळांची आवडती फळे म्हणजे केळी, पेरू, आंबा, सीताफळ आहेत. याशिवाय ते झाडाची पाने, डास, किटक खातात. 

जायंट बॅटचा आकार 22 सेंटीमीटर, तर पंखाचा घेर 50 सेंटीमिटर इतका आहे. फळाच्या शोधात ते 45-50 किलोमीटर उडत जातात. फळबागेतील झाडांवर जेंव्हा वटवाघुळे फळे खायला येतात तेंव्हा शेतकऱ्यांना संकेत मिळतात, की फळे पिकायला आली आहेत. फळे उतरवली पाहीजेत. एकप्रकारे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. वटवाघळे खाल्लेल्या फळांच्या बिया विष्ठेद्वारे टाकतात. विष्ठेद्वारे पडलेल्या बिया जमीनीत चांगल्या प्रकारे रुजतात. वटवाघळांमुळे नकळत परागीभवनही होते. यामुळे हे पर्यावरणपुरक व निसर्गसंवर्धनासाठी हातभार लावणारेच आहेत. तसेच यांच्याद्वारे व्हायरस पसरत असतो. यामुळे त्यांची उष्टी फळे न खाण्यात येणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे, असेही डॉ. पाठक यांनी सांगितले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com