सिद्धार्थमध्ये येणार दोन अस्वल

मधुकर कांबळे 
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

हेमलकसात दोन अस्वल सांभाळले जात आहेत. लवकरच हेमलकसा येथून अस्वलाची जोडी आणली जाणार आहे. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात हत्तीच्या जागेत या अस्वलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने दोन वाघ मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात येणार आहेत; तसेच या प्राणिसंग्रहालयात अस्वलांची जोडी नसल्याने हेमलकसा येथून दोन अस्वल आणण्यात येणार आहेत. हेमलकसा येथून दोन अस्वल घेऊन जाण्याबाबतचे काही दिवसांपूर्वी महापालिका प्राणिसंग्रहालय प्रशासनाला पत्र प्राप्त झाले आहे. 

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वाघांची क्षमता ठरवून दिली आहे. त्यानुसार नऊ वाघ ठेवण्यास मान्यता आहे. एप्रिल महिन्यात समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्याने वाघांची संख्या 12 झाली आहे. यापूर्वीच मुंबई महापालिकेने वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयासाठी दोन वाघांची मागणी केली होती. तसेच सोलापूर येथूनही वाघाची मागणी केली होती. त्यानुसार सर्वसाधारण सभेत मुंबईला दोन वाघ पाठविण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : बाबासाहेबांच्या पुतळ्याला पहिला पुष्पहार हबीबमामूंचा 

त्यांनतर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील दोन वाघ मुंबईला पाठविण्यापूर्वी तेथील वाघांसाठी करण्यात आलेल्या इन्फ्रास्ट्रक्‍चरची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना पाठविले होते. तसेच मुंबई येथून 10 रंगीत पक्षी आणण्यासाठी पत्रही दिले. दरम्यान, मुंबईला वाघ देण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडेही महापालिकेने प्रस्ताव पाठविला होता. त्याला प्राधिकरणाने मंजुरी दिल्याचे प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले असून, लवकरच वाघांची जोडी मुंबईला पाठविली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. 

काय हे : सरकारच्या घोळात अडकली भरपाई 

हत्तीच्या घरात अस्वलांचा मुक्‍काम 

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हेमलकसात दोन अस्वल सांभाळले जात आहेत. लवकरच हेमलकसा येथून अस्वलाची जोडी आणली जाणार आहे. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात हत्तीच्या जागेत या अस्वलांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
सफारी पार्कमध्ये हत्ती नाही 

अपुरी जागा व चुकीच्या रचनेमुळे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांना राहणे गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे येथील सर्व प्राण्यांना प्रस्तावित सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या सफारी पार्कमध्ये हत्तींसाठीही 145 कोटींच्या डीपीआरमध्ये स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते; मात्र नवीन जागेत यापुढे हत्ती ठेवण्यास परवानगी देण्याचे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने बंद केले आहे. त्यामुळे महापालिकेला सफारीपार्कमध्ये हत्ती ठेवण्यास परवानगी नाकारली आहे; तथापि महापालिका प्रशासनाने ज्यावेळी या नियमात बदल होईल तेव्हा तरी सफारी पार्कमध्ये हत्ती ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. 

क्‍लिक करा : घोंगडीला पुनरुज्जीवत करण्यासाठी सरसावल्या महिला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad two bears will come to Siddhartha zoo