esakal | धक्कादायक ! नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबादचा 'पत्ता कट'
sakal

बोलून बातमी शोधा

train-new-1.jpg

डीपीआरसाठी निविदा, औरंगाबादचा साधा उल्लेखही नाही. 

धक्कादायक ! नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबादचा 'पत्ता कट'

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : नागपूर ते मुंबई असा हायस्पीड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र या महत्वाकांक्षी हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबादचा समावेशच केला नसल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, रेल्वे अभ्यासक स्वानंद साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

रेल्वे आणि औरंगाबादवर अन्याय हे समीकरण नविन राहिलेले नाही. रेल्वे बोर्ड किंवा दक्षिण मध्य रेल्वे मराठवाडा आणि विशेषतः औरंगाबादवर सातत्याने अन्याय करत आहे. प्रचंड प्रवाशी असतानाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्याचा हा सिलसिला हायस्पीड रेल्वेच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्याचे स्वानंद साळुंके यांनी यावेळी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी औरंगाबादला स्पेनच्या एका कंपनीच्या प्रतिनिधींनी भेट दिली होती. त्यावेळी मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता. स्पेन कंपनीच्या प्रतिनिधींनी औरंगाबादहून तीन तासात मुंबई आणि औरंगाबादहून तीन तासात नागपूर या हायस्पीड रेल्वेने जाता येणार असल्याचे सांगितले होते. याशिवाय तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनीही लोकसभेत हा विषय उचलून धरला होता. रेल्वे विभागानेही हा मार्ग औरंगाबाद मार्गेच तयार करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय उच्च गती रेल्वे महामंडळ (एनएचएसआरसीएल) यांनी मुंबई ते नागपूर या ७४१ किलोमिटर हायस्पीड रेल्वेसाठी डीपीआर तयार करण्यासाठी नुकतीच निविदा काढली आहे. या निविदेत मुंबई नाशिक आणि नागपूर या शहरांचे नावाचा स्पष्ट उल्लेख करताना औरंगाबादबाबत संभ्रम कायम ठेवला आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग औरंगाबादहून जाणार आहे किंवा नाही. याबाबत या साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच हायस्पीड प्रस्तावित रेल्वे मार्गातून औरंगाबादला वगळण्यात आले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच डीपीआर आणि संबंधीत कामाच्या हालचाली सुरु झाल्याने येथील लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे. सध्या औरंगाबादला दोन खासदार असल्यामुळे रेल्वेवर दबाव टाकून हे काम करुन घेतले तरच येथील विकासाला गती मिळेल अन्यथा पुन्हा औरंगाबाद अनेक वर्ष मागे जाणार असल्याची भिती समितीचे सचिव प्रल्हाद पारटकर यांनी व्यक्त केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजकीय एकजूट केंव्हा !
पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव हा मुंबई नाशिक औरंगाबाद नागपूर या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावानंतर आला आहे. या मार्गासाठी माजी खासदार आढळराव पाटील यांनी प्रचंड जोर लावला. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेते विकासाच्या प्रश्नावर मतभेद विसरून एक होतात, त्यामुळेच त्या भागाचा विकास होतो. मात्र मराठवाड्यात राजकीय इच्छाशक्ती या भागातील मागासलेपणाला कारणीभूत ठरत असल्याची जनभावना बळावत आहे. त्यामुळेच येथील राजकीय नेतृत्वांनी एकत्रित येऊन हायस्पीड रेल्वे साठी पुढाकार घेतला पाहिजे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image