संभाजीनगर हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय, खोटे बोलण्यात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही - अंबादास दानवे

Ambadas Danve
Ambadas Danve

औरंगाबाद : संभाजीनगर हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय असून, शहराच्या नामकरणासाठी पाठपुरावा सुरूच राहील. दुसरीकडे शहराचा विकासही गतीने होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी भागातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. गुंठेवारी भागातील जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना फायदा करून देण्यासाठी शिवसेना प्रत्येक वॉर्डात मदत केंद्र सुरू करणार असल्याचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (ता. आठ) सांगितले.


पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले, की गुंठेवारी अधिनियमाची मुदत वाढविण्यासोबत घाटी रुग्णालयातील ३५० पदे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अनेक वर्षांपासून हे दोन्ही विषय प्रलंबित होते. गुंठेवारी भागातील २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करण्याची मागणी महापालिकेने केली होती. पण शासनाने २०२० पर्यंत मुदत वाढविली आहे. गुंठेवारी अधिनियमानुसार मालमत्ता नियमित करण्यासाठी काय कागदपत्रे लागतील, नोंदणी कशी करावी लागेल? यासह इतर माहिती देण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रत्येक वॉर्डात मदत केंद्रे सुरू केले जातील.

गुंठेवारी नियमितीकरणानंतर पीआर कार्डचा विषयही मार्गी लागेल. महापालिका निवडणुकीमुळे संभाजीनगर, गुंठेवारीसारखे भावनिक विषय शिवसेना समोर आणत आहे का? या प्रश्‍नावर श्री. दानवे म्हणाले, की संभाजीनगर हा विषय आमच्या अस्मितेचा विषय आहे. भावनिक मुद्द्यासोबतच शहराचा झपाट्याने विकास सुरू असल्याचे दानवे यांनी नमूद केले. यावेळी संतोष जेजूरकर, राजू वैद्य, विश्‍वनाथ स्वामी, संतोष खेंडके उपस्थित होते.

शिवसेनेमुळे गुंठेवारी भागाचा विकास
जुन्या शहरातील दंगलीने त्रस्त झालेले नागरिक स्थलांतरित झाले व गुंठेवारी वसाहती निर्माण झाल्या. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने या भागात विकास कामे झाली. या भागात तुरळक वसाहती होत्या. त्यावेळी शिवसेनेने संरक्षण दिले. शिवसेनेचे शाखाप्रमुख पुंडलीकराव राऊत चोरट्यांशी चारहात करताना मृत्यूमुखी पडले. त्यानंतर शिवसेनानेते चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी या भागाचे पुंडलीकनगर असे नामकरण केले, असे दानवे म्हणाले.

औरंगाबादच्या आणखी ताज्या बातम्या वाचा

भाजपने सत्ता असताना काय केले?
संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत होती. गुंठेवारीची मुदत वाढविण्याच्या प्रस्तावावर भाजप नगरसेवकांनीदेखील सह्या केल्या आहेत, असे भाजपतर्फे सांगितले जात आहे. गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यावेळी हे विषय का मार्गी लागले नाहीत? खोटे बोलण्यात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही, असा टोला दानवे लगावला.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com