परीक्षेसंदर्भात बामुचा प्लॅन ए, बी, सी तयार : कुलगुरु डॉ. प्रमोद येवले

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे सुरु असलेला लॉकडाऊन तीन मे १५ मे किंवा ३१ मे दरम्यान संपला तरी, परीक्षेच्या संदर्भात प्लॅन ए, बी आणि सी तयार करण्यात आले आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार परीक्षा घेण्यात येतील. त्यानंतरच विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडर तयार केले जाईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

डॉ. येवले यांनी शुक्रवारी (ता. २४) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. येवले म्हणाले, लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला तरी, परीक्षेसंदर्भात आम्ही तीन प्लॅन केले आहेत. येत्या काळात ज्या भागात कोरोनाबाधित नसतील, त्याठिकाणी परीक्षा कशाप्रकारे घ्याव्यात किंवा कधी घ्याव्यात, यासंदर्भातील निर्णय यूजीसी घेणार असून त्यांच्या निर्देशानुसारच परीक्षा होतील.

कोरोना टेस्टिंग लॅबला महिना लागेल

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विद्यापीठास कोरोना टेस्टिंग लॅबला परवानगी मिळाली आहे. त्यानुसार थर्मोफेशियल लिमिटेडकडे यंत्रसामुग्री मागणी केली होती. मात्र, तीन दिवसांपूर्वीच यंत्रसामुग्री उपलब्ध नाही, असा मेल मिळाला. ती अमेरिकेतून मागवण्यासाठी चार आठवड्यांची मुदत त्यांनी मागितली आहे. त्यामुळे विद्यापीठात लॅब सुरू होण्यासाठी किमान एक महिना लागण्याची शक्यता कुलगुरुंनी व्यक्त केली. 

व्हेंटिलेटरच्या प्रोटोटाइपसाठीही १५ दिवसांचा अवधी

विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल विकास केंद्रातर्फे व्हेंटिलेटर बनवण्यात येत आहे. याबाबतचे सुटे भाग तैवान येथून मागवण्यात आले आहेत. सात दिवसात ते येतील, त्यानंतरच्या सात दिवसात व्हेंटिलेटरचे प्रोटोटाइप बनवले जाईल. त्यानंतर कंपनीकडे जाऊन सीएसआर मधून उत्पादन करण्यात येईल. कंपनी ॲक्टनुसारच इन्क्युबेशन सेंटरची स्थापना झाली असून, विद्यापीठातर्फे ही निर्मिती करता येऊ शकते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ही शासन स्तरावर परवानगी मिळवून देण्यात येईल, असे कळवल्याचे कुलगुरु म्हणाले.

मानसशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांचे समुपदेश

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. यात मास्क निर्मिती, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सॅनीटायझर निर्मिती, हॅन्ड फ्री सॅनीटायझर डिस्पेंसर, व्हेंटिलेटर बनविण्यात येत असून आता विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र विभागातर्फे समुपदेशन करण्याची तयारी आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.

संवैधानिक अधिकारी लॉकडाऊनमुळे रुजू होण्यास अडचण निर्माण झाली आहे. मागितल्यानुसार त्यांना मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर तो प्रश्न मिटेल. लॉकडाऊन काळात रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ही पगार होणार आहेत. कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांचेही पैसे दिले जातील, तसेच विद्यापीठातील वसतिगृह जिल्हा प्रशासनाला विलगीकरणासाठी दिले असून विद्यार्थ्यांचे साहित्य पंचनामा करून सील करण्यात आले आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. याची काळजी घेण्यात आली आहेत. असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी प्र-कुलगुरु डॉ. प्रविण वक्ते यांची उपस्थित होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com